नाशिक : थकबाकीदारांचा वीजपुरवठा त्वरित खंडित करा : चंद्रकांत डांगे | पुढारी

नाशिक : थकबाकीदारांचा वीजपुरवठा त्वरित खंडित करा : चंद्रकांत डांगे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
राज्यभरात ग्राहकांना अखंडित वीजसेवा देणार्‍या महावितरणची आर्थिक घडी विस्कटल्याने थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्यात येणार आहे. सहकार्य न करणार्‍या ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करावा, असे निर्देश महावितरणच्या कोकण प्रादेशिक विभागाचे सहव्यवस्थापकीय संचालक चंद्रकांत डांगे यांनी दिली आहे.

नाशिक येथील महापारेषणच्या सभागृहात सोमवारी (दि.23) महावितरणच्या नाशिक व मालेगाव मंडळाच्या आढावा बैठकीप्रसंगी ते बोलत होते. यावेळी नाशिक परिमंडलाचे मुख्य अभियंता दीपक कुमठेकर, नाशिक मंडलाचे अधीक्षक अभियंता ज्ञानदेव पडळकर आणि मालेगाव मंडळाचे अधीक्षक अभियंता रमेश सानप उपस्थित होते. चंद्रकांत डांगे म्हणाले की, ‘ना नफा, ना तोटा’ तत्त्वाने वीजसेवा देणार्‍या महावितरणवर एक ग्राहक म्हणून वीजखरेदी, पारेषण खर्च तसेच विविध कर्ज व त्यांच्या हप्त्यांचे सद्यस्थितीत करोडो रुपयांचे दायित्व आहे. थकबाकीमुळे महावितरणच्या अस्तित्वाचा प्रश्न बिकट बनल्याचे ते म्हणाले. आज वीज एक मूलभूत गरज असताना ग्राहकांकडून वीजबिल भरण्यास प्राधान्य दिले जात नसल्याची खंत व्यक्त करतानाच डांगे यांनी थकबाकीदारांवर कारवाईचे निर्देश दिले. दीपक कुमठेकर यांनी या महिन्यात वीजदेयक वसुलीसह ग्राहकसेवा अधिक गतिमान करण्याचे आवाहन केले. बैठकीला नाशिक व मालेगाव मंडळातील सर्व कार्यकारी अभियंते, अभियंते, अधिकारी व मीटर रीडिंग एजन्सीचे कर्मचारी उपस्थित होते.

एजन्सीवर कारवाई करावी – ग्राहकांच्या वीजमीटर रीडिंगसाठी एजन्सी नेमण्यात आल्या आहेत. या एजन्सींनी महिन्याकाठी मीटरचे अचूक वाचन करून, योग्य व वेळेत देयक देणे आवश्यक आहे. मीटर वाचन करताना फोटोंचा दर्जा सुधारण्यास व अचूक काम करावे, अशा सूचना एजन्सीला देण्यात आल्या आहेत. पण कार्यक्षमता न सुधारल्यास संबंधित मीटर रीडिंग एजन्सींवर तत्काळ करावाई करावी, असे आदेश डांगे यांनी दिले.

हेही वाचा:

Back to top button