नाशिक : बिबट्याचे हल्लासत्र थांबता थांबेना! | पुढारी

नाशिक : बिबट्याचे हल्लासत्र थांबता थांबेना!

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
देवळाली कॅम्प भागातील जमाल सॅनिटोरियम येथील उन्हवणे वस्तीवर पुन्हा बिबट्याने हल्ला करत पाळीव श्वानाचा फडशा पाडल्याची घटना रविवारी (दि.22) पहाटेच्या सुमारास घडली. यामुळे उन्हवणे कुटुंबीय दशहतीच्या सावटात असून, वनविभागाने तत्काळ येथे कायमस्वरूपी पिंजरा लावण्याची मागणी केली आहे.

याबाबत रूपाली सुरेश उन्हवणे यांनी माहिती देताना सांगितले की, आम्ही येथे साधारण सन 2019 पासून वडिलोपार्जित जागेत कुटुंबीयांसह वास्तव्यास आहोत. मात्र, आमच्या कुटुंबीयांवर तसेच पाळीव प्राण्यांवर आतापर्यंत बिबट्याने अनेकदा हल्ले केले आहेत. त्यात आम्हीही जखमी झालेलो आहोत. तर आमचे अनेक पाळीव प्राणी बिबट्याचे शिकार झाले आहेत. रविवारी (दि.22) पहाटेही बिबट्याने आमच्या श्वानावर हल्ला करत त्याला ठार केले. ही घटना आम्ही सकाळी पाहिली. यापूर्वीही वनविभागाकडे आम्ही बिबट्याच्या बंदोबस्तासाठी पिंजर्‍याची मागणी केली होती. परंतु वनविभाग याकडे गांभीर्याने घेत नाही. आम्ही दररोज दहशतीत जगत असून, आमच्यावर बिबट्या कधीही हल्ला करण्याची शक्यता असते. तसेच घराबाहेर पडतानाही जिकिरीचे ठरत आहे. त्यामुळे वनविभागाने येथे केवळ दोन-तीन दिवस पिंजरा लावून केवळ कार्यवाहीचा देखावा न करता येथे कायमस्वरूपी पिंजरा लावावा व आमचे संरक्षण करावे, अशी मागणीही रूपाली उन्हवणे यांनी केली आहे.

रविवारी नाइट पेट्रोललिंगचे पथक वाहनासह घटनास्थळी पाहणी करतील. तसेच सोमवारी (दि.23) सकाळी उन्हवणे यांच्या घराच्या परिसरात पिंजरा लावण्यात येईल. या भागात केवळ एकच कुटुंब वास्तव्यास असून, परिसरात झाडे-झुडपे व जंगल असल्याने बिबट्याच्या अधिवासासाठी मोकळे रान मिळते. त्यामुळे या भागात बिबट्यांचे नियमित दर्शन घडते. उन्हवणे कुटुंबीयांनी दक्ष राहण्याची गरज असून, काटवनच्या भागाची स्वच्छता करावी. वनविभागातर्फे उपाययोजना करण्यात येत आहेत. – अनिल अहिरराव, वनपाल

हेही वाचा:

Back to top button