नाशकात मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट ; दहा वर्षीय मुलावर हल्ला | पुढारी

नाशकात मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट ; दहा वर्षीय मुलावर हल्ला

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा
सिन्नर सार्वजनिक वाचनालयाच्या परिसरात मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट झाला असून, या मोकाट कुत्र्यांनी वाचनालयाच्या आवारातून जाणार्‍या विद्यार्थ्यावर हल्ला करून त्याला जखमी केल्याची घटना नुकतीच घडली. नगर परिषदेने परिसरातील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.

कुणाल अरविंद भांडगे (10, रा. देशमुख वाडा, सिन्नर) असे जखमी विद्यार्थ्याचे नाव आहे. शहराच्या बहुतांश भागांत मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट झाला असून, नागरिकांना पायी चालणेही मुश्कील झाले आहे. रात्रीच्या वेळी एकट्यादुकट्या माणसावर हल्ला ही बाब नित्याचीच असून काही दिवसांपूर्वी दुपारी चारच्या सुमारास वाचनालयाच्या वरच्या मजल्यावरील कॉम्प्युटर क्लासमध्ये आलेल्या विद्यार्थ्यावर मोकाट कुत्र्यांनी हल्ला करीत त्याला जखमी केले.

बघ्यांनी विद्यार्थ्याला कुत्र्यांच्या तावडीतून सोडविण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांच्यावरही हे कुत्रे धावू लागल्याने मदतीसाठी धावणार्‍यांसमोरही पेच निर्माण झाला. मात्र, मदतीसाठी येणार्‍यांची संख्या वाढल्यानंतर कुत्र्यांनी विद्यार्थ्याला सोडून पळ काढला.

घटना सीसीटीव्हीत
दरम्यान, कुत्र्याच्या या हल्ल्याचा व्हिडिओ वाचनालयाच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाला असून, बघ्यांनी घाबरलेल्या विद्यार्थ्याला आधार दिल्याचे व्हिडिओत दिसत आहे. वाचनालयाच्या परिसरात मोकाट कुत्र्यांची संख्या वाढली आहे. वाचनालयात पुस्तक बदलण्यासाठी अथवा इतर कारणांसाठी येथे येणार्‍या नागरिकांमध्ये कुत्र्यांची दहशत पसरली आहे.

हेही वाचा :

Back to top button