धुळ्यात गुंगीकारक औषधांची तस्करी करणाऱ्या युवकाला बेड्या | पुढारी

धुळ्यात गुंगीकारक औषधांची तस्करी करणाऱ्या युवकाला बेड्या

धुळे ; पुढारी वृत्तसेवा : धुळ्यात गुंगीकारक औषधांची तस्करी करणाऱ्या तरुणास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक हेमंत पाटील यांच्या पथकाने रंगेहात पकडले. हा साठा गुजरात राज्यातील सुरत येथून धुळ्यात आला असल्याने आता या औषधांची तस्करी करणाऱ्या मुख्य आरोपीचा शोध धुळे पोलिसांनी सुरू केला आहे.

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक हेमंत पाटील यांना धुळ्यात गुंगीकारक औषधाची तस्करी होणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार त्यांनी पथकाला अलर्ट केले होते.

या दरम्यान गजानन कॉलनी भागात राहणारा शाहरुख शेख मुनाफ हा संशयित युवक (क्र. एमएच 18 वाय 5495) दुचाकीवरून गजानन कॉलनी परिसरात फिरत असून, त्याच्याकडे गुंगीकारक औषधाचा मोठा साठा असल्याची माहिती मिळाली. त्यामुळे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील आणि अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे किशोर देशमुख यांच्या समवेत सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश पाटील, उपनिरीक्षक योगेश राऊत, हवालदार संजय पाटील, संदीप सरग, प्रकाश सोनार, योगेश चव्हाण, कमलेश सूर्यवंशी, राहुल गिरी, सागर शिर्के, आदी पथकाने गजानन कॉलनी परिसरातून शाहरुख शेख मुनाफ याला ताब्यात घेतले. त्याची झडती केली असता त्याच्याकडे गुंगीकारक औषधांच्या 355 बाटल्या आढळून आल्या. त्याची पोलीस ठाण्यात अधिक चौकशी केली असता धुळे येथे राहणाऱ्या अन्य साथीदाराच्या मदतीने गुंगीकारक औषधाचा हा साठा सुरत येथून धुळ्यात आणल्याची माहिती त्याने दिली. त्यामुळे पोलिस पथकाने आता धुळ्यातील दुसरा तस्कर यांच्यासह सुरत येथील प्रमुख तस्करांच्या मुसक्या आवळण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. दरम्यान या संदर्भात चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा

Back to top button