नाशिक : ‘नासाका’मुळे चार तालुक्यांतील शेतकर्‍यांमध्ये नवचैतन्य -शांतिगिरी महाराज | पुढारी

नाशिक : ‘नासाका’मुळे चार तालुक्यांतील शेतकर्‍यांमध्ये नवचैतन्य -शांतिगिरी महाराज

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा
खा. हेमंत गोडसे यांच्या अथक परिश्रम आणि संघटन कौशल्यामुळे गेल्या नऊ वर्षांपासून बंद असलेला कारखाना पुन्हा नव्या जोमाने सुरू होत असून, इगतपुरी, सिन्नर, नाशिक आणि त्र्यंंबकेश्वर या तालुक्यातील शेतकर्‍यांसाठी ही अभिमानाची बाब आहे. नाशिक सहकारी साखर कारखान्याची गळीत हंगाम चाचणी यशस्वी झाल्याने चार तालुक्यांतील शेतकर्‍यांमध्ये नवचैतन्य निर्माण होणार असल्याचे प्रतिपादन शांतिगिरी महाराज यांनी केले.

नाशिक सहकारी साखर कारखान्याची गळीत हंगाम चाचणी यशस्वी झाली. शांतिगिरी महाराज यांच्या हस्ते तब्बल नऊ वर्षांनंतर कारखान्याच्या गव्हाणीत उसाची मोळी टाकण्यात आली. कर्जबाजारीपणामुळे गेल्या नऊ वर्षांपासून बंद असलेल्या साखर कारखान्याची सूत्रे दोन महिन्यांपूर्वी खा. गोडसे आणि दीपक बिल्डर्स अ‍ॅण्ड डेव्हलपर्स यांच्याकडे आली. खा. गोडसे यांनी 3 मे रोजी बॉयलर अग्निप्रदीपन केले होते. त्यानंतर 24 तास कारखान्यात सुरू असलेल्या मशीनरीच्या दुरुस्तीकडे लक्ष केंद्रित केले होते. त्यांच्या दुर्दम्य इच्छाशक्तीला यश आले असून, सोमवारी (दि.16) गळीत हंगामाची प्रात्यक्षिक घेण्यात आलेली चाचणी यशस्वी झाली आहे.

यावेळी शांतीगिरी महाराज यांच्या हस्ते गव्हाणीत उसाची मोळी टाकण्यात आली. तत्पूर्वी दीपक चांदे, सागर गोडसे, भाग्यश्री गोडसे यांच्या हस्ते गव्हाण व काट्याची विधिवत पूजा करण्यात आली. यावेळी खा. गोडसे यांनी कारखाना सुरू करण्यासाठी गेल्या दीड महिन्यापासून केलेल्या प्रयत्नांची माहिती उपस्थित शेतकर्‍यांना दिली. ऊस उत्पादक शेतकर्‍यांच्या हितासाठी आणि त्यांना पुन्हा गतवैभव मिळवून देण्यासाठी कारखाना पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतल्याची भूमिका यावेळी त्यांनी स्पष्ट केली.
यावेळी अजिंक्य गोडसे, भक्ती गोडसे, कारखान्याचे माजी चेअरमन तानाजी गायधनी, जिल्हा बँकेचे कार्यकारी संचालक शैलेश पिंगळे, प्राधिकृत अधिकारी दीपक पाटील, मतिन बेग, एस. टी. भोर, आर. एम. इरसूल, सुधाकर गोडसे, तन्मय सूर्यवंशी, सरपंच सुरेखा गायधनी, दिलीप गायधनी, लीलाबाई गायधनी, विष्णू गायधनी आदी उपस्थित होते.

कारखाना चालविण्याचे शिवधनुष्य सर्वांच्या आशीर्वादाने उचलले आहे. त्यामुळे ऊस उत्पादक, अधिकारी, कर्मचारी, ऊसतोडणी कामगार, वाहतूकदार या सर्वांची साथ फार महत्त्वाची आहे. कारखान्याचा चाचणी गळीत हंगाम यशस्वी करून पुढील 2022-23 गळीत हंगामाची तयारी सुरू करणार आहोत.
– हेमंत गोडसे, खासदार

हेही वाचा :

Back to top button