धुळ्याचे महापौर प्रदीप कर्पे यांनी दिला राजीनामा | पुढारी

धुळ्याचे महापौर प्रदीप कर्पे यांनी दिला राजीनामा

धुळे; पुढारी वृत्तसेवा : धुळ्याचे महापौर प्रदीप करपे यांनी आपल्या पदाचा राजीनामा आयुक्त देविदास टेकाळे यांना सादर केला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेश आणि कायद्याचा आदर राखून हा राजीनामा देत असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. यासंदर्भात १७ मे रोजी सर्वोच्च न्यायालयात अंतिम निर्णय होण्यापूर्वी कर्पे यांनी सोमवारी (दि.१६) आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

धुळ्याच्या महापौरपदाचे दुसऱ्या टप्प्यासाठी शासनाने ईतर मागास वर्गीय पदासाठी आरक्षण निश्चित करण्यात आले. आरक्षणाच्या या मुद्द्यावरून धुळ्याचे सामाजिक कार्यकर्ते गणेश निकम यांनी उच्च न्यायालयात या आरक्षणाला आव्हान दिले. त्यानुसार कामकाज झाल्यानंतर उच्च न्यायालयाने शासनाने काढलेल्या ओबीसी आरक्षणाला स्थगिती दिली. यानंतर या निर्णयाला नगरसेवक प्रदीप करपे आणि अन्य दोघांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. सर्वोच्च न्यायालयात गेल्या काही महिन्यांपासून या याचिकेवर कामकाज सुरू आहे. या दरम्यान न्यायालयाने महापौर पदाच्या आरक्षणासंदर्भात १७ मे पर्यंत निर्णय देणार असल्याचे सांगून करपे यांना राजीनामा देण्याचे सुचवण्यात आल्याचे सांगितले जाते आहे.

न्यायालयाचा निर्णय तसेच कायद्याचा आदर म्हणून करपे यांनी नगर सचिव मनोज वाघ यांच्या माध्यमातून आयुक्त देविदास टेकाळे यांना हा राजीनामा सादर केला आहे. दरम्यान आज, १७ मे रोजी सर्वोच्च न्यायालयात आरक्षणाच्या मुद्द्यावरून दाखल झालेल्या याचिकेवर अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे. हा निर्णय विरोधात गेल्यास महानगरपालिकेतील सत्ताधारी भारतीय जनता पार्टीच्या गटाला हा मोठा धक्का असल्याचे बोलले जात आहे.

Back to top button