धुळे : रात्री कुटुंब घराच्या छतावर झोपण्यासाठी गेले, इकडे चोरट्यांनी डाव साधला | पुढारी

धुळे : रात्री कुटुंब घराच्या छतावर झोपण्यासाठी गेले, इकडे चोरट्यांनी डाव साधला

धुळे (पिंपळनेर) पुढारी वृत्तसेवा
रात्रीचे जेवण करून घराच्या छतावर झोपण्यासाठी गेलेल्या कुटुंबियांच्या घरात चोरट्यांनी दागिन्यांवर डल्ला मारल्याची घटना जिल्ह्यातील देशशिरवाडे येथे उघडकीस आली. या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

साक्री तालुक्यातील देशशिरवाडे येथे जितेश पगारे यांच्या घरी चोरट्यांनी संधी साधत अंदाजे ३ लाख ५० हजारांचा दागिन्यांचा ऐवज चोरुन नेला. देशशिरवाडे गावाच्या सुरुवातीला पिंपळनेर-सटाणा रस्त्यालगत जितेश शांताराम पगारे यांचे घर आहे. ते रात्री जेवण करून ११ वाजेच्या सुमारास घराच्या छतावर सहकुटुंब झोपण्यासाठी गेले होते. मात्र पहाटेच्या सुमारास घराचा मागील दरवाजा उघडा असल्याचे पगारे यांना दिसून आले. घरात जाऊन पाहिले असता घराच्या मधल्या खोलीत असलेले कपाट उघडे दिसले. सदर कपाटातून चोरट्यांनी सोन्याची पोत, अंगठ्या, कानातले व इतर सोन्या-चांदीचे दागिने असा अंदाजे ३ लाख ५० हजार रुपये किमतीचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला. अशी माहिती जितेश पगारे यांनी दिली. दरम्यान चोरी करून चोरट्यांनी कपाटातील साहित्य अस्ताव्यस्त फेकून दिले होते. या संदर्भात त्यांनी पिंपळनेर पोलीस ठाण्यात तक्रारी अर्ज दिला आहे.

या चोरीच्या घटनेचा पिंपळनेर पोलिसांनी पंचनामा केला आहे. साधारणत: वर्षभरापासून शहरातील एका बँकेत महागडी सोन्याची पोत त्यांनी लॉकरमध्ये सुरक्षित ठेवली होती. मात्र गेल्या काही दिवसांपूर्वीच विविध सण समारंभ व विवाह सोहळ्या निमित्त ही पोत जितेश पगारे यांनी लॉकरमधून काढून आणली होती. दुर्दैवाने चोरट्यांनी त्यांच्या घरी चोरी केली आणि या चोरीमध्ये पत्नीचे व मुलीचे सोन्या-चांदीचे दागिने आणि लॉकर मधून काढून आणलेली पोत देखील चोरून नेली.

सध्या उन्हामुळे उकाडा जाणवत आहे. त्यामुळे अनेक भागांमध्ये कुटुंबीय घराच्या छतावर झोपण्यासाठी जात असतात तर चोरटे चोरी करण्याची एकही संधी सोडत नाही. त्यामुळे नागरिकांनी चोरीच्या घटना बघता वेळीच सावध झाले पाहिजे. तर उन्हाळ्याच्या सुट्टीत बाहेरगावी जातांना देखील खबरदारी घेतली पाहिजे. कारण यापूर्वी पिंपळनेर शहरात देखील अशा चोरीच्या अनेक घटना घडल्या आहेत. तर पोलिसांनी देखील नागरिकांमध्ये जनजागृती करावी अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. देशशिरवाडे येथील घटनेत चोरट्यांनी घरातील लोक उन्हाळ्याच्या निमित्ताने छतावर झोपण्यासाठी गेल्याचा डाव साधत हातसफाई केली आहे. या घटनेमुळे परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

हेही वाचा :

Back to top button