नाशिकमध्ये चौदा दिवसांत तब्बल 'इतक्या' किलो सोन्यावर डल्ला | पुढारी

नाशिकमध्ये चौदा दिवसांत तब्बल 'इतक्या' किलो सोन्यावर डल्ला

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
शहरात मे महिन्यात चोरी, घरफोडी, जबरी चोरी, वाहनचोरीचे प्रकार नित्याचे झाले असून, त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांकडील सुमारे एक कोटी रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला आहे. त्यात सव्वा किलोहून अधिक वजनाच्या सोन्याच्या दागिन्यांचा समावेश आहे. यापैकी मोजकेच गुन्हे उघडकीस आले आहेत.

शनिवारी (दि.14) सकाळच्या सुमारास इंदिरानगर व म्हसरूळ पोलिस ठाण्यांच्या हद्दीत दुचाकीस्वार चोरट्यांनी पत्ता विचारण्याच्या बहाण्याने तीन वृद्धांकडील सुमारे दोन लाख रुपयांचे सहा तोळे वजनाचे दागिने ओरबाडून नेल्याच्या घटना घडल्या. तासाभरात एकापाठोपाठ घडलेल्या या घटनांनी शहरातील पोलिस बंदोबस्ताविषयी प्रश्न उपस्थित होत आहेत. शहरात 1 ते 14 मेदरम्यान वाहनचोरी, घरफोडी, चोरी, जबरी चोरीसारखे प्रकार रोजच समोर येत असून, या प्रकरणी 50 हून अधिक गुन्हे दाखल झाले आहेत. दाखल गुन्ह्यांनुसार चोरट्यांनी सुमारे एक कोटी पाच लाख 81 हजार 601 रुपयांचा ऐवज चोरल्याचे समोर आले आहे. त्यात एक किलो 354 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने चोरून नेले आहे. त्याचप्रमाणे 26 दुचाकी, दोन चारचाकी वाहनांसह, मोबाइल, महागडे लॅपटॉप, रोकड, औद्योगिक वसाहतीतील किमती धातू, घरगुती साहित्य, खाद्यतेल आदी ऐवजही चोरला आहे. त्यामुळे पोलिस दप्तरी चोरट्यांनी चोरलेल्या ऐवजाची किंमत जरी एक कोटी रुपयांपर्यंत असली तरी प्रत्यक्षात त्याची किंमत आजच्या बाजारभावाप्रमाणे चार कोटी रुपयांच्या पुढे आहे. त्यामुळे या चोरट्यांना पकडून त्यांच्याकडून नागरिकांची मालमत्ता परत मिळवणे गरजेचे आहे.

खबर्‍यांचे जाळे झाले विस्कळीत…

शहरातील पोलिसांचे खबर्‍यांचे जाळे विस्कळीत झाल्याचे बोलले जात आहे. पोलिस गस्त नियमित नसल्याचा फायदा चोरटे घेत असल्याचे चित्र आहे. सातपूर येथील दरोड्याची उकल करण्यात पोलिसांना अद्याप यश आलेले नाही. या प्रकारे अनेक गुन्हे उघडकीस न आल्याने आजही कोट्यवधी रुपयांची मालमत्ता चोरट्यांच्याच ताब्यात आहे.

हेही वाचा :

Back to top button