नाशिक : रंगकाम करणार्‍या दोघांनी घरातून 30 तोळे सोने, लाखोंची रोकड केली लंपास | पुढारी

नाशिक : रंगकाम करणार्‍या दोघांनी घरातून 30 तोळे सोने, लाखोंची रोकड केली लंपास

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
शहरातील तिडके कॉलनी येथील गौरव बंगल्यात रंगकाम करणार्‍या दोघा संशयितांनी घरातून 30 तोळे वजनाचे सोन्याचे बिस्किटे व साडेआठ लाख रुपयांची रोकड चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी गौरव अतुल चांडक (33) यांनी मुंबई नाका पोलिस ठाण्यात दोघांविरोधात चोरीची फिर्याद दाखल केली आहे.

मुंबई नाका पोलिस ठाणे हद्दीतील तिडके कॉलनीमधील चांडक सर्कल येथे उद्योजक अतुल चांडक यांचे निवासस्थान आहे. गौरव चांडक यांच्या फिर्यादीनुसार त्यांच्या घरात 27 मार्च ते 4 मे 2022 या कालावधीत रंगरंगोटीचे काम सुरू होते. यासाठी ठेकेदारामार्फत रंगकाम करणारे कारागीर नियुक्त केले होते. त्यापैकी संशयित संजय यादव (28, रा. जि. कानपूर, उत्तर प्रदेश), साहील मकसूद मन्सुरी (27, रा. फतेहपूर, उत्तर प्रदेश) हे दोघे तरुण कामगारही रंगकाम करीत होते. चोरट्यांनी बंगल्यातील एका लाकडी कपाटात ठेवलेले प्रत्येकी 100 ग्रॅम वजनाचे सोन्याचे तीन बिस्किटे, तसेच आठ लाख 50 हजारांची रोकड लांबविल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

चोरीची घटना उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी घरात कामासाठी येणार्‍या कामगारांची तपासणी केली असता त्यातून यादव व मन्सुरी बेपत्ता असल्याचे आढळून आले. त्याचप्रमाणे त्यांचे मोबाइलही बंद आढळले. त्यामुळे संशयावरून दोघांविरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दोघांच्या शोधासाठी तपास पथक रवाना केले आहेत.

हेही वाचा :

Back to top button