केतकी चितळेप्रकरणी सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया, म्‍हणाल्‍या, "कुणाच्‍याही वडिलांची..." | पुढारी

केतकी चितळेप्रकरणी सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया, म्‍हणाल्‍या, "कुणाच्‍याही वडिलांची..."

पुढारी ऑनलाईन डेस्क : राष्ट्रवादीचे अध्यक्ष व ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याविषयी आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट केल्याप्रकरणी अभिनेत्री केतकी चितळेला अटक करण्यात आली आहे. केतकीवर टीकेची झोड उठवली जात असताना राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही आपली प्रतिक्रिया देताना आपण केतकी चितळेला ओळखत नसल्याचे म्हटले आहे. तसेच कुणाच्याही वडिलांच्या मृत्यूची कामना करणे गैर आहे, असेही त्यांनी म्हटले आहे. त्या नाशिक येथे आज (रविवार) पत्रकारांशी बोलत होत्या.

यावेळी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याबद्दल केतकी चितळे यांनी केलेल्या आक्षेपार्ह पोस्टबाबत विचारले असता सुप्रिया सुळे म्हणाल्या की, मी केतकीला ओळखत नाही. याबाबत कायदा आपले काम करेल. परंतु असल्या प्रकारचे समर्थन होऊ शकत नाही. कोणत्याही संस्कृतीचा हा भाग होऊ शकत नाही. अशी विकृती समाजात निर्माण झाली आहे. कुणाच्याही वडिलांनी मरावे, अशी आपली भावना असता कामा नये. त्यामुळे कुणाबाबतही अपशब्द काढताना भान असणे गरजेचे आहे. मीही कुणावरही अपशब्द काढत नाही. कारण माझ्यावर चांगले संस्कार झाले आहेत. त्यातच माझ्यावर मराठी संस्कार झाल्याने मी कुणाबाबतही अपशब्द काढत नाही. आणि ते माझ्या संस्कारात बसत नाही. शेवटी प्रत्येकाची संस्कृती असते, असेही त्या म्हणाल्या.

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर आतापर्यंत १०९ वेळा छापे टाकण्यात आले आहेत. देशमुख यांना अटक करून अनेक महिने झाले आहेत. परंतु केंद्रीय यंत्रणांच्या हाती काहीही लागलेले नाही. त्यांच्यावर आरोप करणारे गायब झाले आहेत, असेही त्या म्हणाल्या. देशात महागाई वाढली आहे. यावर कुणीही बोलत नाही. यावर तोडगा काढण्याऐवजी नको त्या गोष्टींवर चर्चा घडवून आणली जात आहे. विविध प्रश्नांबाबत पंतप्रधान मोदींनी सर्व मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घ्यावी. दरम्यान, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राष्ट्रवादीने खंजीर खुपसला, अशी टीका केली आहे. याबाबत विचारले असता सुळे म्हणाल्या की, राज्यात तीन पक्षांचे सरकार आहे. त्यामुळे भांड्याला भांड लागणार, आणि ते लागलेलं चांगलंच आहे, नवरा-बायकोतही भांडणे होतात की, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

हेही वाचलंत का ? 

Back to top button