धुळे : पुढारी वृत्तसेवा ; धुळे जिल्ह्यातील तापमानात दिवसेंदिवस वाढ होत असून ते 43 डिग्री सेल्सिअस पर्यंत पोहचले आहे. अशात शहरातील बहुसंख्य भागांमध्ये आठवड्यातून केवळ एकदाच पाणीपुरवठा केला जात असल्याने नागरिकांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. मनपा प्रशासन आणि सत्ताधारी भाजपाच्या नियोजनशून्य कामामुळे ही पाणीटंचाई निर्माण झाल्याचा आरोप करीत काल शिवसेनेने कावड मोर्चा काढून आपला रोष व्यक्त केला. प्रशासनाने ही पाणीटंचाई तात्काळ दूर न केल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी शिवसेनेने दिला.
धुळे शहरातील बहुसंख्य भागांमध्ये गेल्या आठ ते दहा दिवसांपासून पाणीपुरवठा झाला नसल्याने शहरात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. या पाणीटंचाईला हैराण होत नागरिकांनी महापालिकेवर हंडा मोर्चा काढून आपला रोष देखील व्यक्त केला आहे. मात्र मनपा प्रशासनाने अद्यापही पाणी टंचाई दूर करण्यासाठी सकारात्मक पावले टाकली नसल्याचा आरोप करीत काल शिवसेनेने कावड मोर्चा काढून महानगरपालिका आयुक्त देविदास टेकाळे यांच्या दालनामध्ये ठिय्या आंदोलन केले.
यावेळी सहसंपर्कप्रमुख महेश मिस्त्री, महानगरप्रमुख मनोज मोरे, माजी नगरसेवक संजय वाल्हे, डॉ. सुशील महाजन, संदीप सूर्यवंशी, धीरज पाटील, भरत मोरे, महिला आघाडीच्या हेमाताई हेमाडे यांच्यासह शेकडो शिवसैनिक या आंदोलनात सहभागी झाले. शिवसैनिकांनी शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालया जवळून काढलेला हा मोर्चा थेट आयुक्त देविदास टेकाळे यांच्या दालनापर्यंत नेला. यानंतर त्यांनी दालनात ठिय्या आंदोलन सुरू केले. आयुक्त टेकाळे हे त्यावेळी कार्यालयात नसल्यामुळे सहाय्यक आयुक्त नितीन कापडणीस यांनी आंदोलकांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. मात्र आयुक्त आल्याशिवाय आंदोलन संपणार नसल्याची भूमिका शिवसैनिकांनी घेतली. सुमारे तासाभरानंतर आयुक्त टेकाळे हे दालनात आले. यावेळी शिवसैनिकांनी त्यांना चांगलेच धारेवर धरले.
धुळे शहराला तापी योजना, नकाणे तलाव आणि डेडरगाव तलावाच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जातो. यासर्व जलस्त्रोतांमध्ये पुरेसा पाणीसाठा असताना देखील धुळे शहरांमध्ये कृत्रिम पाणी टंचाई निर्माण केली गेल्याचा आरोप यावेळी शिवसैनिकांनी केला. मनपा प्रशासन आणि सत्ताधारी भाजप यांच्यात अभद्र युती असून नागरिकांना वेठीस धरण्याचे काम केले जात असल्याचा आरोप देखील यावेळी करण्यात आला. शहरातील सर्वच भागांमध्ये आठ ते दहा दिवसांपासून पाणी नसताना प्रशासनाने काय पावले उचलली, असा जाब यावेळेस विचारण्यात आला. मात्र सकारात्मक व समाधानकारक उत्तर मिळत नसल्याने शिवसैनिकांचा रोष आणखीनच वाढला. अखेर आयुक्त देविदास टेकाळे यांनी शहरात किमान पाच दिवसांनंतर पाणी देण्याचे आश्वासन दिल्यामुळे आंदोलन मागे घेण्यात आले. मात्र धुळे शहरात कृत्रिम पाणीटंचाई कमी न केल्यास महानगरपालिकेच्या सत्ताधारी भाजपा आणि प्रशासनाच्या विरोधात तीव्र स्वरूपाचे आंदोलन केले जाईल असा इशारा यावेळी शिवसैनिकांनी दिला.