नमामि गोदा प्रकल्प पूर्ण करणार; देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही | पुढारी

नमामि गोदा प्रकल्प पूर्ण करणार; देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

नाशिक; पुढारी वृत्तसेवा : ‘नमामि गंगे’च्या धर्तीवर गोदावरी शुद्धीकरणासाठी नाशिकमध्ये नमामि गोदा प्रकल्प साकारण्यात येणार असून, हा प्रकल्प पूर्णत्वास नेला जाईल, अशी ग्वाही एका कार्यक्रमानिमित्त मंगळवारी (दि.१०) नाशिकमध्ये आलेल्या माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

यावेळी ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील नद्या शुद्धीकरणाची मोहीम हाती घेतली आहे. त्याचाच एक भाग म्हणून नाशिकमध्ये हा ‘नमामि गोदा’ हा प्रकल्प साकारण्यात येणार आहे. गोदावरी निर्मळ राहिली पाहिजे, ही आमची प्रामाणिक इच्छा आहे. त्यामुळे हा प्रकल्प पूर्णत्वास येईपर्यंत केंद्रस्तरावर त्यासाठी आवश्यक ती मदत आणि पाठपुरावा केला करणार आहे.

कुंभमेळ्यातही भाजपने नाशिकला भरीव मदत केली होती, असेही त्यांनी सांगितले. कोरोना काळ हा परीक्षेचा काळ होता. त्या काळात नाशिक महापालिकेने खूप चांगले काम केले. तेव्हा राज्य सरकारने नव्हे तर नाशिक मनपाने रुग्णालय उभारले. काही जण घरात बसून सल्ले देत होते, थट्टा करत होते. पण मी स्वतः राज्यभरातील रुग्णालयांमध्ये फिरत होतो, असे सांगत त्यांनी अप्रत्यक्षपणे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. हनुमान चालिसाचे महत्व आता अनेकांच्या लक्षात आल्याचेही त्यांनी सांगितले.

Back to top button