नाशिक : मोरझर तलावातून गाळउपसा सुरू | पुढारी

नाशिक : मोरझर तलावातून गाळउपसा सुरू

नाशिक (नांदगाव) : पुढारी वृत्तसेवा : येथील युवा मित्र संस्थेने दुष्काळाच्या सावटाखाली वावरणार्‍या मोरझर येथे जलसमृद्धीतून विकासाकडे या उपक्रमांतर्गत जलसाठा समृद्ध करण्यासाठी गावातील लेंडी नदी व सिमेंट बंधारे पाझर तलावातील गाळ काढून खोली वाढवण्याच्या कामास प्रारंभ करण्यात आला आहे.

मोरझर गाव दुष्काळातून मुक्त करण्यासाठी सरपंच लीना पाटील यांनी सातत्याने पत्रव्यवहार करून युवा मित्र संस्थेकडे पाठपुरावा केला. त्यांच्या पाठपुराव्याची दखल घेत न्याय मिळाला असून, टाटा ट्रस्ट व गॅलक्सी या दोन संस्थांनी यासाठी सीएसआर निधी उपलब्ध करून दिला आहे. युवा मित्रच्या कार्यकारी संचालिका मनीषा पोटे यांच्या मार्गदर्शनाखाली मोरझर येथील गावाजवळील नदीच्या खोलीकरणाच्या कामाचा प्रारंभ करण्यात आला आहे. वर्षानुवर्षे साचलेल्या गाळामुळे गावातील पिण्याच्या पाण्यासाठी तसेच शेतीच्या पाण्यासाठी तलावाचा उपयोग होत नव्हता. त्यामुळे सरपंच यांनी स्थानिक शेतकर्‍यांच्या मदतीने पुढाकार घेऊन युवा मित्रच्या सहाय्याने जलसमृद्धीतून विकासाकडे ही संकल्पना राबविण्याचा निर्णय घेतला. गाळउपसानंतर शेतकर्‍यांना बंधार्‍यातील गाळ शेतात टाकून जमीन सुपीक करून घेण्याचे आवाहन करण्यात आले. त्यासाठी गाळ वाहून नेण्याची संपूर्ण प्रक्रिया समजावून सांगण्यात आली. सरपंच लीना पाटील यांचे हस्ते कामाचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी मोरेश्वर गाळ उपसा समितीचे अध्यक्ष सचिन चोळके, सूर्यभान चोळके, कैलास चोळके, वसंत चोळके, विनायक चोळके, अशोक चोळके, नारायण निकम, गणपत पावशे, हिरामण माळी, संतोष सोनवणे आदी शेतकरी व युवामित्रचे पदाधिकारी तुळशीराम घागरे, ऋषिकेश डांगे, कमलेश काळे उपस्थित होते.

हेही वाचा :

Back to top button