नाशिक : जिल्ह्यात तीन वर्षांत 2,068 एचआयव्हीग्रस्त

नाशिक www.pudhari.news
नाशिक www.pudhari.news
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यात 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2022 या कालावधीत 2,068 एचआयव्ही बाधित आढळून आले आहेत. या तीन वर्षांच्या कालावधीत एकूण सहा लाख 84 हजार 846 नागरिकांच्या चाचण्या केल्या आहेत. एचआयव्ही बाधितांमध्ये 121 गर्भवती महिलांचा समावेश होता. त्यापैकी दोनच नवजात बालकांना एचआयव्हीची बाधा झाली आहे.

जिल्ह्यात 2005 साली 11 हजार 989 नागरिकांच्या चाचण्या केल्यानंतर, त्यापैकी 733 जणांना एचआयव्हीची बाधा झाली होती. त्यानंतर नियमित आरोग्य तपासणी, एचआयव्हीबाबत जनजागृती, समुपदेशनाच्या जोरावर जिल्ह्यातील एचआयव्ही बाधितांची संख्या 6.11 वरून 0.30 इतकी झाली आहे. एचआयव्ही बाधितांची संख्या कमी करण्यासोबतच एचआयव्ही बाधितांच्या आरोग्यासाठी जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सतर्क असते. त्यासाठी जिल्हा शासकीय रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत नागरिकांच्या चाचण्या केल्या जातात. एचआयव्ही बाधित शोधण्यासाठी व त्याच्या जनजागृतीसाठी अनेक स्वयंसेवी संस्था कार्यरत आहेत. त्यांच्यामार्फत वेश्या, ट्रकचालक, समलिंगी व असुरक्षित लैंगिक संबंध ठेवणारे, स्थलांतरित कामगारवर्गाची नियमित आरोग्य चाचणी केली जात असते. गर्भवतींकडून नवजात बालकांना एचआयव्हीची बाधा होऊ नये, यासाठी गर्भवतींची चाचणी केली जाते. त्यानुसार, 2019 मध्ये एक लाख 71 हजार 720 चाचण्यांपैकी 49 गर्भवती एचआयव्ही बाधित आढळून आल्या, तर 2020 मध्ये एक लाख 35 हजार 46 चाचण्यांमध्ये 35 गर्भवतींना एचआयव्हीची बाधा आढळून आली. 2021 मध्ये एक लाख 51 हजार 944 चाचण्यांमध्ये 37 गर्भवतींना एचआयव्ही झाल्याचे स्पष्ट झाले. या गर्भवतींकडून त्यांच्या नवजात बालकांना एचआयव्ही होऊ नये, यासाठी गर्भवतींना औषधोपचार केले जातात. त्यामुळे अवघ्या दोन बालकांनाच एचआयव्ही बाधा झाली.

यामुळे लागण होते : असुरक्षित शरीरसंबंध ठेवल्यामुळे, एकच इंजेक्शन इतरांनी वापरल्यामुळे. अमली पदार्थ सेवन करणार्‍यांकडून ही चूक होत असल्याचे आढळून आले आहे. औषधोपचार न केल्यास गर्भवती मातेकडून तिच्या बाळास एचआयव्ही होऊ शकतो. एचआयव्ही बाधिताचे रक्त दुसर्‍याला दिल्यास लागण होण्याचा धोका होता. मात्र, आता हा धोका जवळपास संपुष्टात आला आहे.

वर्षनिहाय केलेल्या चाचण्या व एचआयव्ही बाधित वर्ष चाचणी बाधित
2019 :  2,95,025 860
2020  : 1,57,979 468
2021  : 2,31,842 619

कोणालाही शंका असल्यास त्यांनी एचआयव्हीची चाचणी करून घ्यावी. एचआयव्ही बाधित आढळून आल्यास त्याच्यावर उपचार सुरू केले जातात. इतरांना एचआयव्ही बाधा होऊ नये, यासाठी खबरदारी कशी घ्यावी, याचे मार्गदर्शन केले जाते. एचआयव्ही बाधितांनी औषधोपचार नियमित व वेळेवर घ्यावेत. त्यात खंड पडू देऊ नये. आहार, औषधोपचारामुळे दीर्घायुष्य मिळते. – योगेश परदेशी, जिल्हा कार्यक्रम अधिकारी, जिल्हा एड्स नियंत्रण व प्रतिबंध पथक.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news