नाशिक : मनपाच्या सिटीलिंकची दोन मार्गांवर जलद बससेवा ; कामगारांची गैरसोय दूर होणार | पुढारी

नाशिक : मनपाच्या सिटीलिंकची दोन मार्गांवर जलद बससेवा ; कामगारांची गैरसोय दूर होणार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा : नाशिक महापालिकेच्या नाशिक महानगर परिवहन महामंडळ अर्थात सिटीलिंकमार्फत सीबीएस ते सिन्नर (मार्ग क्रमांक 152) आणि सीबीएस ते पिंपळगाव (मार्ग क्रमांक 146 ए) या दोन मार्गांवर चार जलद बससेवा सुरू करण्यात आल्या आहेत. संबंधित दोन्ही मार्गांवरून अनेक कर्मचारी, कामगार दररोज ये-जा करत असतात. अशा कर्मचार्‍यांची होणारी गैरसोय या जलद बसेसमुळे दूर होणार आहे.

मार्ग क्रमांक 146 ए वरील फेरी क्रमांक 1 नुसार सिन्नर ते निमाणी ही बस सकाळी 9 वाजता निघेल. या मार्गावर सिन्नर तहसील कार्यालयापासून सिन्नर, सिन्नर एमआयडीसीपर्यंत सर्वसाधारण थांबे देण्यात आले असून, त्यानंतर ही बस थेट नाशिकमधील बिटको येथे थांबा घेईल. त्यानंतर कर्मचार्‍यांच्या सोयीकरिता उपनगर, व्दारका, शालिमार, सीबीएस, अशोकस्तंभ, रविवार कारंजा, पंचवटी, निमाणी या ठिकाणी बस थांबेल. फेरी क्रमांक 2 नुसार निमाणी ते सिन्नर बस सायंकाळी 6.30 वाजता निघेल. ही बसदेखील निमाणी, पंचवटी, रविवार कारंजा, अशोकस्तंभ, सीबीएस, शालिमार, व्दारका, उपनगर, बिटको येथून थेट सिननर येथे पोहोचेल. त्याचबरोबर मार्ग क्रमांक 152 वरील फेरी क्रमांक 1 अंतर्गत पिंपळगाव ते नवीन सीबीएस ही बस सकाळी 9.15 वाजता निघेल. पिंपळगाव-वणी चौफुली ते पिंपळगाव मार्केट यार्ड, दरम्यान सर्वसाधारण थांबे घेऊन थेट नाशिकमधील औरंगाबाद नाका येथे पोहोचेल. फेरी क्रमांक 2 नुसार नवीन सीबीएस ते पिंपळगाव नुसार सायंकाळी 6.15 वाजता ही बसदेखील नवीन सीबीएस, रविवार कारंजा, पंचवटी कारंजा, निमाणी, औरंगाबाद नाकामार्गे थेट पिंपळगावपर्यंत धावेल. कार्यालयीन वेळेनुसार या चारही जलद बसफेर्‍या सुरू करण्यात आल्याने कर्मचार्‍यांची गैरसोय टळणार असून, कर्मचार्‍यांनी बससेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.

सिटीलिंक बसफेर्‍या सुरूच – सिटीलिंकच्या कोणत्याच बसफेर्‍या शनिवारी, शासकीय सुट्टीचा अपवाद वगळता कधीही रद्द न करता पूर्ण क्षमतेने सुरू आहे. केवळ रविवार आणि शासकीय सुट्टी असल्यास कामगार, विद्यार्थी, नोकरदार प्रवाशांची संख्या कमी असते. त्यामुळे केवळ काही फेर्‍या कमी करण्यात येतात. त्यातही प्रवाशांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घेतली जात असल्याचे व्यवस्थापनाने कळविले आहे. वेळापत्रकात कोणताही बदल झाल्यास प्रवाशांना सिटीलिंक अ‍ॅप तसेच संकेतस्थळाच्या माध्यमातून आगाऊ सूचना केली जाते.

हेही वाचा :

Back to top button