नाशिक : शहरातील 524 उद्याने आजपासून खुली | पुढारी

नाशिक : शहरातील 524 उद्याने आजपासून खुली

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
कोरोना महामारीसंदर्भातील बहुतांश सर्वच निर्बंध काढून टाकण्यात आल्याने शहरातील सर्वच उद्याने खुली करण्याचे निर्देश पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दोन दिवसांपूर्वीच आढावा बैठकीत मनपा प्रशासनाला दिले होते. त्यानंतर मनपा प्रशासक रमेश पवार यांनी शहरातील सर्व 524 उद्याने बुधवार (दि. 27) पासून खुली करण्याचा निर्णय घेतला असून, उद्यानांची देखभाल, दुरुस्तीसह स्वच्छता करून नागरिकांना खुले करण्याचे आदेश उद्यान विभागाला दिले आहेत.

कोरोनाच्या पहिल्या आणि दुसर्‍या लाटेमध्ये महापालिकेने शहरातील जलतरण तलाव, उद्याने, नाट्यगृह, जॉगिंग ट्रॅक पूर्णपणे बंद केली होती. दुसरी लाट ओसरल्यानंतर उद्याने खुली होण्याच्या बेतात असतानाच ओमायक्रॉन या तिसर्‍या लाटेच्या प्रादुर्भावामुळे उद्याने खुलीच होऊ शकली नाहीत. गर्दीची ठिकाणे बंदच ठेवण्यात आली होती. लसीकरणामुळे पहिल्या आणि दुसर्‍या लाटेपेक्षा कोरोनाची तिसरी लाट सौम्य ठरल्याने गर्दीच्या ठिकाणांसाठी लावण्यात आलेली नियमावली शिथिल करण्यात आल्याने जनजीवन पूर्ववत होण्यास मदत झाली. परंतु, उद्याने आणि जलतरण तलाव या थेट संपर्क येण्याची ठिकाणे बंदच ठेवण्यात आली होती. त्यामुळे उद्याने खुली कधी होणार, याकडे लक्ष लागून होते.

शहरातील ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांच्या द़ृष्टीने उद्याने अत्यंत महत्त्वाची आहेत. त्यानुसार ही विरंगुळा केंद्रे सुरू व्हावीत या अनुषंगाने उद्यान विभागाला नियोजन करण्याचे आदेश दिले आहेत. शहरातील रुग्णसंख्या सध्या शून्यावर आहे. त्यामुळेच शहरातील मनपाची 524 उद्याने खुले करण्यात येत आहेत.
– रमेश पवार,
आयुक्त, मनपा

महापालिकेचे
आदेश औपचारिकता…

निर्बंध उठवल्यानंतर महापालिकेनेदेखील टप्प्याटप्प्याने शहरातील निर्बंध उठवले. जलतरण तलाव आणि उद्यानांवरील निर्बंध कायम ठेवण्यात आले असले, तरी बहुतांश उद्याने खुलीच करण्यात आलेली होती. त्यामुळे आता महापालिकेचे उद्याने खुले करण्याचे आदेश ही केवळ औपचारिकता ठरणार आहे. त्यातही पालकमंत्री छगन भुजबळ यांनी उद्याने खुली करण्याचे आदेश दिल्याने मनपा प्रशासनालाही दुसर्‍याच दिवशी भूमिका घ्यावी लागली.

हेही वाचा :

Back to top button