नाशिक : तृतीयपंथी व्यक्तीवर लिंगभेदी टीका करणाऱ्यावर गुन्हा दाखल | पुढारी

नाशिक : तृतीयपंथी व्यक्तीवर लिंगभेदी टीका करणाऱ्यावर गुन्हा दाखल

येवला; पुढारी वृत्तसेवा : यु ट्यूबच्या माध्यमातून तृतीयपंथी व्यक्तीला लिंगभेदी व वर्णभेदी टिप्पणी करीत दमबाजी व शिवीगाळ करण्यात आली आहे. याप्रकरणी संबधीत तृतीयपंथी व्यक्तीच्या तक्रार आधारे येवला शहर पोलिसांनी बारामतीच्या एक यु ट्यूब चॅनेल चालवणाऱ्या महिलेवर गुन्हा दाखल केला आहे. सदर गुन्हा बारामती येथे घडल्याने तक्रार बारामती पोलिसांकडे वर्ग केला आहे.

भारतामध्ये तृतीयपंथी समुदायाच्या संरक्षणासाठी 2020 मध्ये पारित झालेला ट्रांसजेंडर व्यक्ति (अधिकार संरक्षण कायदा ) 2020 कलम 18 (d) अंतर्गत महाराष्ट्रातील पहिला गुन्हा भा दं वि कलम 506 खाली येवला शहर पोलीस ठाण्यामध्ये दाखल केला.

सागर पोपट शिंदे उर्फ महंत शिवलक्ष्मी संजय झाल्टे (किन्नर आखाडा महंत, रा. पारेगाव रोड, येवला) यांनी सागर मंथन नावाने युट्युब चॅनल सुरू केले आहे. या यूट्यूब चॅनलवर व्हिडियो पाहून बारामती येथील विजया बारामतीकर उर्फ विजया रमेश गावडे यांनी शिवलक्ष्मी झाल्टे यांना वर्णभेदी व लिंगभेदि टीका केली. तसेच शिवलक्ष्मी झाल्टे यांच्या जाती बद्दल अपशब्द वापरून त्यांची भावना दुखावून धमकी देखील दिली, असे तक्रारीमध्ये नमूद केले आहे.

किन्नर असलेल्या शिवलक्ष्मी झाल्टे यांनी बीड येथील निराधार सामाजिक संस्थेच्या सचिव सत्यभामा सौंदरमल आणि मालेगाव येथील सामाजिक कार्यकर्त्या कल्याणी माळी यांची मदत घेऊन सोमवारी रात्री उशीरा येवला शहर पोलीस स्टेशन गाठले. महाराष्ट्रात हा पहिलाच गुन्हा दाखल झाला असल्यामुळे खळबळ उडाली आहे.

Back to top button