नाशिक : जिल्ह्यात उद्यापर्यंत आरोग्य मेळाव्यांमधून काम सुरू | पुढारी

नाशिक : जिल्ह्यात उद्यापर्यंत आरोग्य मेळाव्यांमधून काम सुरू

नाशिक : पुढारी वृत्तसेवा : केंद्रीय आरोेग्य मंत्रालयातर्फे आयुष्मान भारत योजनेंतर्गत देशातील 30 वर्षांवरील सर्व नागरिकांची आरोग्य पत्रिका तयार करण्याचे काम सुरू आहे. यासाठी जिल्हा आरोग्य विभागातर्फे आरोग्य मेळाव्यांचे आयोजन केले जात आहे. यावेळी नागरिकांची तपासणी करून त्यांची ऑनलाइन आरोग्य पत्रिका तयार केली जात आहे. या आरोग्य पत्रिकेत प्रत्येक नागरिकांची आरोग्यविषयक सर्व माहिती असणार असून, भविष्यात त्या आरोग्य पत्रिकेच्या क्रमांकावरून आरोग्यविषयक बाबींची माहिती सहज उपलब्ध होऊ शकणार आहे, माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर यांनी दिली.

केेंद्र सरकारने चार वर्षांपूर्वी आयुष्मान भारत योजना सुरू करून त्यात जवळपास 50 कोटी नागरिकांना पाच लाख रुपयांपर्यंतचे उपचार मोफत करता येणार आहे. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी सरकारकडून वैद्यकीय पायाभूत सुविधा उभारण्याचे काम सुरू असून, त्यासोबतच देशातील 30 वर्षांवरील सर्व नागरिकांची आरोग्य पत्रिका तयार करण्याच्या मोहिमेस प्रारंभ झाला आहे. जिल्हयातील प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या माध्यमातून नागरिकांची आरोग्य पत्रिका तयार करण्याचे काम सुरू झाले आहे. या आरोग्य पत्रिकेला विशिष्ट क्रमांक आहे. रुग्णालयात हा क्रमांक सांगितल्यानंतर संबंधित नागरिकांची आरोग्यविषयक माहिती एका क्लिकवर उपलब्ध होऊ शकणार आहे. याशिवाय 30 वर्षांवरील सर्व नागरिकांची माहिती आरोग्य मंत्रालयाकडे उपलब्ध झाल्यामुळे महामारी, साथरोग यावेळी सरकारला विशिष्ट आजार असलेल्या रुग्णांवर प्रतिबंधक उपाययोजना करायच्या असल्यास या माहितीचा उपयोग होऊ शकणार आहे.

जिल्ह्यात 21 एप्रिलपर्यंत आरोग्य मेळावे
जिल्हयातील सर्व ग्रामीण व उपजिल्हा रुग्णालयांमध्ये सध्या आरोग्य मेळावे सुरू असून, ते 21 एप्रिलपर्यंत सुरू राहणार आहेत. नागरिकांनी या मेळाव्यातून आरोग्य पत्रिका तयार करून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यासाठी नागरिकांचे आधारकार्ड व आधारकार्डला क्रमांक जोडलेला मोबाइल सोबत असणे आवश्यक आहे.

हेही वाचा :

Back to top button