नाशिक जिल्ह्यातून यंदा एक लाख मेट्रिक टन द्राक्षांची निर्यात | पुढारी

नाशिक जिल्ह्यातून यंदा एक लाख मेट्रिक टन द्राक्षांची निर्यात

लासलगाव : पुढारी वृत्तसेवा
निसर्गाच्या लहरीपणामुळे यंदा द्राक्ष हंगाम लांबणीवर पडला होता. राज्यात नाशिक जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात द्राक्षाची निर्यात होते. हंगामाच्या सुरुवातीला द्राक्षांमध्ये गोडवा उतरलेला नव्हता. त्यामुळे नोंदणी होऊनदेखील निर्यातीचा वेग हा मंदावलेला होता. फेब्रुवारीच्या सुरुवातीपासून उन्हात वाढ झाल्याने द्राक्ष ही निर्यातीयोग्य झाली आहेत. यंदा 17 एप्रिलपर्यंत 7501 कंटेनरमधून 1 लाख 1 हजार 500 मेट्रिक टन द्राक्ष निर्यात झाली आहे.

यंदाचा द्राक्ष हंगाम अखेरच्या टप्प्यात आला तरीही चीनला होणारी द्राक्ष निर्यात अद्याप सुरूच झाली नसल्याने द्राक्ष निर्यातीची टक्केवारी घटलेली आहे. युद्धामुळे रशिया आणि युक्रेनला होणारी निर्यातही विस्कळीत झाली आहे. याचा मोठा फटका द्राक्ष उत्पादक शेतकर्‍यांना बसत आहे. समाधानाची बाब म्हणजे युरोपीयन देशांना होणारी निर्यात सुरळीत सुरू आहे.

नाशिकच्या द्राक्ष हंगामाला यंदा 7 जानेवारीला सुरुवात झाली असून, अजूनही द्राक्ष हंगाम सुरू होऊन तीन महिन्यांचा काळ पूर्ण होत आला आहे. मात्र, निसर्गाचा लहरीपणा आणि सातत्याने कंटेनर भाड्यात होत असलेली वाढ याने द्राक्ष निर्यातीला फटका बसत आहे.

राज्यात नाशिक आणि सांगली जिल्ह्यात निर्यातक्षम द्राक्षांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. यात नाशिक जिल्ह्यात निफाड, दिंडोरी, चांदवड, सटाणा, देवळा आणि मालेगाव तालुक्यांत मोठ्या प्रमाणात द्राक्षांची लागवड करण्यात आली आहे. अनेक संकटांवर मात करत द्राक्ष निर्यातीचा हंगाम अंतिम टप्प्यात आलेला असून, आतापर्यंत 1 लाख 1 हजार 500 मेट्रिक टन द्राक्ष निर्यात नोंद एपिडावर झाली आहे.

अशी झाली निर्यात
नेदरलँड 66210
इंग्लंड 12207
जर्मनी 10432
पोलंड 3596
डेन्मार्क 1033
स्पेन 854

हेही वाचा :

Back to top button