नाशिक (मालेगाव) : पुढारी वृत्तसेवा : 2001 नंतर शांतता नांदत असलेल्या मालेगाव शहरात काही राजकीय पक्ष, संघटनांमुळे भयपूर्ण वातावरण निर्मिती होत असल्याने यंत्रणांनी विशेष लक्ष देण्याची आवश्यकता निदर्शनास आणून देत राष्ट्रवादी काँग्रेसचे महानगर जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार आसिफ शेख यांनी, कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी त्वरित पोलिस बंदोबस्त वाढविण्याची मागणी केली आहे. याबाबत त्यांनी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांना निवेदन पाठविले असून, बुधवारी (दि.13) अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत खांडवी यांच्याशी चर्चा करण्यात आली.
मालेगाव अतिसंवेदनशील शहर म्हणून ओळखले जाते. सध्या रजमान पर्व सुरू असून, येत्या 2 अथवा 3 तारखेला रमजान ईद साजरी होणार आहे. तत्पूर्वी चैत्रोत्सवासाठी धुळे, शहादा, शिरपूरसह संपूर्ण खान्देशमधून भाविक सप्तशृंगगडावर पायी जात आहेत. दरवर्षी हे यात्रेकरू शांततेत जातात. परंतु, मंगळवारी (दि.12) रात्री 8 ते 12 दरम्यान काही राजकीय नेते, त्यांची मुले आणि मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी जुना आग्रा मार्गावर दरेगाव ते बसस्थानकापर्यंत मोठ्याने वाद्य वाजवत, घोषणाबाजी करत पदयात्रा केली. अनेक मशिदींच्या परिसरातून यात्रा गेली. शहरात प्रथमच अशी घटना घडली. हा शहरातील शांतता भंग करण्याचा प्रयत्न असल्याची शंका माजी आमदार शेख यांनी व्यक्त केली आहे.
एकूणच परिस्थिती आणि आगामी ईदच्या पार्श्वभूमीवर शहरात कडेकोट बंदोबस्त करण्यात यावा, जेणेकरून कायदा व सुव्यवस्था अबाधित राहील, अशी मागणी त्यांनी गृहमंत्र्यांकडे केली आहे. याप्रश्नी त्यांनी दुपारी अपर पोलिस अधीक्षक खांडवी यांच्याशी चर्चा करत सविस्तर विषय मांडला. खांडवी यांनी शहरात आवश्यक तो बंदोबस्त तैनात असून, सर्व घडामोडींवर लक्ष ठेवले जात असल्याचे स्पष्ट केले. याप्रसंगी सभागृहनेते असलम अन्सारी यांसह इतर पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान, त्यात सोमवारी (दि.11) रात्री फारान हॉस्पिटलजवळ डीजेवर झालेल्या दगडफेकीच्या घटनेचा संदर्भ नसल्याचा मुद्दा चर्चेचा ठरला.