नाशिक : ‘आझादी का अमृतमहोत्सव’ अंतर्गत केंद्र सरकारकडून ‘हेल्थ मेळा’

नाशिक हेल्थ मेळा www.pudhari.news
नाशिक हेल्थ मेळा www.pudhari.news
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा : 'आझादी का अमृतमहोत्सव' अंतर्गत केंद्र सरकारकडून 'हेल्थ मेळा' आयोजित केला जाणार असून, जिल्ह्यातील 15 तालुक्यांमध्ये याचे आयोजन केले जाणार आहे. याबाबतच्या मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या असून, ग्रामीण भागातील आरोग्य सुधारण्यावर भर देणे हा यामागील प्रमुख हेतू असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.

जिल्ह्यातील विविध विकासकामांचा आढावा घेतल्यानंतर ना. डॉ. भारती पवार यांनी जिल्हाधिकारी कार्यालय येथे पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी जिल्हाधिकारी गंगाथरन डी. उपस्थित होते. पुढे ना. डॉ. भारती पवार म्हणाल्या की, ग्रामीण आरोग्य सुधारण्यासाठी लोकांचे स्क्रीनिंग करून हे शिबिर कसे होईल याबाबत आढावा घेण्यात आला आहे. जिल्ह्यात आयुष्यमान भारत या योजनेचे 16 लाख लाभार्थी आहेत. यातील 4 लाख 15 हजार नागरिकांना योजना कार्ड प्राप्त झाले आहे. उर्वरित लाभार्थ्यांना कार्ड प्राप्त करून देण्याबाबत प्रयत्न केले जाणार आहेत. या शिबिरासाठी नोडल अधिकारी म्हणून जिल्हा शल्यचिकित्सकांच्या माध्यमातून नियोजन केले जाईल. या शिबिरात मेडिकल महाविद्यालये, जिल्हा रुग्णालये, बिगर शासकीय संस्था यांचाही समावेश केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

तसेच अटल मिशन 2.0 अंतर्गत सुरगाणा, मनमाड, येवला व नांदगाव या ठिकाणी सर्व्हे केला आहे. ही योजना राबविण्याबाबत केंद्राकडून मागणी करण्यात येणार आहे. जलजीवन मिशनअंतर्गत सात लाख घरांना 'हर घर जल' या अंतर्गत पाणी पुरविले आहे. तर पाच लाख 67 हजार घरांना कनेक्शन दिले गेले आहे. लसीकरण पूर्ण करण्यावरही भर दिला जात आहे. त्यासाठी 'हर घर दस्तक' हा कार्यक्रम राबविला जात आहे. निडल फ्री लसीकरणासाठी प्रशिक्षणाची गरज आहे. तसेच कोरोनामुळे अनाथ झालेल्या 55 बालकांना पीएम केअर फंडमधून बालसंगोपन मदत, वारस नोंद, शिधापत्रिका अधिकार्‍यांनी मदतीचा हात दिला आहे.

शेतकर्‍यांची फसवणूक करणार्‍यांवर कारवाई
जिल्ह्यातील द्राक्ष, डाळिंब उत्पादक शेतकर्‍यांची फसवणूक झाल्याच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. काही कंपन्यांनी शेतकर्‍यांचा विश्वास संपादन करून त्यांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. 2016 ते 2017 या कालावधीत सर्वाधिक फसवणुकीची प्रकरणे समोर आली आहेत. शेतकर्‍यांची फसवणूक करणार्‍यांवर कारवाई करावी, अशा स्पष्ट सूचना ग्रामीण पोलिसांना दिल्या आहेत. त्याचबरोबर गावात आलेल्या व्यापार्‍यांची पोलिसपाटील यांना माहिती देणे तसेच शेतकर्‍यांसाठी हेल्पलाइन क्रमांक उपलब्ध करून देणे, अशाही सूचना दिल्याचे ना. डॉ. भारती पवार यांनी सांगितले.

वनपट्टे आढावा
वनपट्ट्यांबाबत केंद्र सरकारच्या माध्यमातून आपण दिशा दिली आहे. 32 हजार 224 प्रकरणे मंजूर झाले असून, 150 प्रकरणे प्रलंबित आहेत. यासोबतच 32 हजार सातबार्‍यांचे कामेही पूर्ण झाले आहेत. एप्रिलअखेर हे सर्व प्रकरणे निकाली लागतील. गावपातळीवर विभागीय, जिल्हा आणि राज्यस्तरावर आमचे काम सुरू असल्याचेही ना. डॉ. पवार यांनी सांगितले.

टँकरची पूर्तता करा
जिल्ह्यातील ज्या भागात पाणीटंचाईची समस्या आहे, त्या भागात टँकरची पूर्तता करा याबाबतचे निर्देश देण्यात आले आहेत. उन्हाळ्यात पाण्यावाचून काहीही अडचण येणार नाही, याची काळजी घेतली जात असल्याचेही ना. डॉ. पवार यांनी सांगितले.

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news