नाशिक : मनसेचे माजी जिल्हाप्रमुख अनंता सूर्यवंशी यांचे निधन | पुढारी

नाशिक : मनसेचे माजी जिल्हाप्रमुख अनंता सूर्यवंशी यांचे निधन

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी ग्रामीण जिल्हाध्यक्ष तथा माजी नगरसेवक अनंता देवराम सूर्यवंशी (४९) यांचे गुरुवारी (दि. १४) सकाळी ह्रदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.

अनंता सूर्यवंशी व त्यांचे मित्र डॉ. बोरसे हे नेहमीप्रमाणे गुरुवारी सकाळी ओझर रोड परिसरातील जलतरण तलाव येथे स्विमिंगसाठी कारमधून चालले होते. यावेळी त्यांना रस्त्यातच अस्वस्थ वाटू लागल्याने डॉ. बोरसे यांनी तातडीने त्यांना जवळच्या एका खासगी रुग्णालयात नेले. या रुग्णालयाच्या पायऱ्या चढत असतानाच त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. यानंतर त्यांना तातडीने आडगांव नाक्यावरील अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र तत्पूर्वीच त्यांचे निधन झाल्याचे तेथील डॉक्टरांनी तपासून सांगितले.

त्यांच्या मृत्यूची बातमी समजताच अपोलो रुग्णालयासह पंचवटीतील अमृतधाम परिसरातील निवासस्थानी व पेशवा हॉटेलवर चाहत्यांनी, नातेवाईकांनी व विविध राजकीय क्षेत्रातील मंडळींनी मोठी गर्दी केली होती. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, भाऊ, दोन बहिणी असा परिवार आहे. आठ ते दहा महिन्यांपूर्वीच त्यांच्या आई-वडिलांचे निधन झाले आहे. मनसेच्या स्थापनेपासून ते पक्षात कार्यरत होते. मितभाषी आणि हसतमुख स्वभावामुळे ते सर्वांना परिचित होते. जमीन खरेदी आणि हॉटेल व्यावसायिक असलेल्या सूर्यवंशी यांचा दांडगा जनसंपर्क असल्याने नाशिक महापालिकेच्या मनसेच्या पहिल्याच निवडणुकीत पंचवटीतील प्रभागातून ते नगरसेवक म्हणून निवडून आले होते. आगामी महापालिका निवडणुकीसाठीही त्यांनी कंबर कसली होती. सूर्यवंशी यांच्या अकाली जाण्याने राजकीय वर्तुळात शोक व्यक्त केला जात असून, पक्षाचे कधीही न भरून निघणारे नुकसान झाले आहे, अशी प्रतिक्रिया मनसेच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे.

दुपारी २ वाजता अंत्ययात्रा
गुरुवारी दुपारी २ वाजता अमृतधाम परिसरातील त्यांच्या निवास्थानापासून अंत्ययात्रा निघणार आहे. पंचवटी अमरधाममध्ये त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहे.

प्रदेश स्तरावर मिळणार होती जबाबदारी
जिल्हाध्यक्ष असताना अनंता सूर्यवंशी यांनी पक्षसंघटन आणि पक्षबळकटीसाठी मोठे प्रयत्न केले होते. नुकताच पार पडलेल्या मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्याची नाशिकच्या नियोजनाची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली होती. पक्षाने दिलेली जबाबदारी अत्यंत सक्षमपणे पार पाडल्याने त्यांना प्रदेश स्तरावर लवकरच मोठी जबाबदारी देण्यात येणार होती. यासंदर्भात मनसेचे ज्येष्ठ नेते बाळा नांदगांवकर यांच्याशी दोनच दिवसांपूर्वी त्यांचे फोनवर बोलणेही झाले होते, अशी चर्चा त्यांनी मनसे पदाधिकारी सौरभ सोनवणे यांच्याशी केली होती.

हेही वाचा :

Back to top button