नाशिक : पेट्रोल पंपचालक पुन्हा कोर्टात जाण्याच्या तयारीत | पुढारी

नाशिक : पेट्रोल पंपचालक पुन्हा कोर्टात जाण्याच्या तयारीत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
‘नो हेल्मेट नो पेट्रोल’ या मोहिमेला शहरातील पेट्रोल पंपचालकांकडून असहकार मिळत आहे. त्यामुळे पोलिस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी पेट्रोल पंपचालकांना सोमवार (दि. 11)पासून पुन्हा कारवाईचा इशारा दिला आहे. त्याविरोधात शहरातील पेट्रोल पंपचालक पुन्हा न्यायालयात जाण्याच्या तयारीत आहेत. याआधी दाखल केलेल्या याचिकेवर पोलिस आयुक्तांनी सुनावणी घेतलेली नसल्याचा आरोप नाशिक जिल्हा पेट्रोल डीलर्स वेलफेअर असोसिएशनने केला आहे.

शहरात अपघाती मृत्यू टाळण्यासाठी पोलिस आयुक्तांनी मोहिमा राबविल्या आहेत. त्यानुसार हेल्मेट नसलेल्या चालकांना पेट्रोल न देण्याचे आदेश पेट्रोल पंपचालकांना दिले आहेत. दरम्यान, काही दिवसांपूर्वी पोलिस आयुक्त पाण्डेय यांनी, जे पंपचालक आदेशाचे पालन करणार नाहीत, त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचा इशारा दिला होता.
त्या निषेधार्थ शहरातील पेट्रोल पंपचालकांनी 2 एप्रिलला एक दिवस शहरातील पेट्रोल पंप बंद ठेवले होते तसेच यापुढे पोलिसांच्या मोहिमेला असहकार्य करण्याचे धोरण राबविले.

त्यामुळे पोलिस आयुक्तांनी गुरुवारी (दि. 7) शहरातील पोलिसांना पेट्रोल पंपचालकांना लेखी समज देण्याच्या सूचना केल्या आहेत. त्याचप्रमाणे जे पंपचालक नियमांची अंमलबजावणी करणार नाहीत, त्यांच्यावर सोमवारपासून कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, राज्यपाल यांच्या दौर्‍यामुळे पंपचालकांना नोटीस बजाविण्यात आल्या नसल्याचे शहर वाहतूक शाखेच्या वतीने सांगण्यात आले. तर नाशिक जिल्हा पेट्रोल डीलर्स वेलफेअर असोसिएशनचे अध्यक्ष भूषण भोसले यांनी सांगितले की, या निर्णयाविरोधात आम्ही पुन्हा न्यायालयात जाणार आहोत. कायदेशीर उत्तर दिले जाईल. त्यामुळे पेट्रोल पंपचालक व पोलिस यंत्रणेतील वाद चिघळण्याची शक्यता आहे.

हेही वाचा :

Back to top button