धुळे : ईडी विरोधात आंदोलन भोवले ; 30 शिवसैनिकांविरोधात गुन्हा दाखल | पुढारी

धुळे : ईडी विरोधात आंदोलन भोवले ; 30 शिवसैनिकांविरोधात गुन्हा दाखल

धुळे पुढारी वृत्तसेवा : ईडीसह राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस तसेच भारतीय जनता पार्टीचे नेते किरीट सोमय्या यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करुन आंदोलन करणे धुळे जिल्हा शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना चांगलेच महागात पडले आहे. जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश असताना देखील परवानगी न घेता आंदोलन केल्या प्रकरणात शिवसेनेच्या 30 कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिवसेनेचे नेते संजय राऊत यांची मालमत्ता जप्त केल्यानंतर काल धुळ्यात शिवसेनेने आंदोलन केले. या आंदोलनामध्ये ईडीच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. तसेच राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पार्टीचे नेते किरीट सोमय्या यांच्या पुतळ्याचे देखील दहन करण्यात आले. यावेळी शिवसैनिकांनी जुन्या महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारासमोर टरबूज फोडून विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचा निषेध केला. यावेळी पोलिसांनी मज्जाव केला असता पोलिसांचा विरोध डावलून हे आंदोलन करण्यात आले. त्यामुळे आता पोलिसांनी जिल्हा प्रशासनाचा प्रतिबंधात्मक आदेश मोडल्याने या प्रकरणात गुन्हा दाखल केला आहे.

यासाठी कॉन्स्टेबल व्ही. ए. पाटील यांनी धुळे शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार भारतीय जनता शिवसेनेचे महानगरप्रमुख मनोज मोरे, सहसंपर्कप्रमुख महेश मिस्त्री तसेच किरण जोंधळे, सतिष महाले, संजय गुजराती, अतुल सोनवणे, हिलाल माळी, गुलाब माळी, जिल्हाप्रमुख डॉक्टर तुळशीराम गावित, प्रफुल्ल पाटील यांच्यासह तीस जणांविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धुळे जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश लागू असल्याने कार्यकारी दंडाधिकारी तथा तहसीलदार यांनी दिलेल्या परवानगीशिवाय काढण्यात आलेले मोर्चे, सभा, रॅली, आंदोलन करण्यास मनाई आहे. याची माहिती असताना देखील शिवसैनिकांनी या आदेशाचे उल्लंघन केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

हेही वाचा :

Back to top button