नाशिकच्या साहित्य संमेलनाचा इतका झाला खर्च

नाशिक साहित्य संमेलन,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
शहरात गेल्या डिसेंबर महिन्यात झालेल्या 94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा हिशेब अखेर जाहीर करण्यात आला असून, या संमेलनासाठी 3 कोटी 44 लाख 28 हजार 949 रुपये खर्च झाला असून, 13 लाख 16 हजार 645 रुपये शिल्लक असल्याचे सांगण्यात आले.

साहित्य संमेलनानंतर तीन महिने उलटूनही संमेलनाचा हिशेब जाहीर केला नसल्याने आयोजकांवर टीका होत होती. या पार्श्वभूमीवर आयोजक लोकहितवादी मंडळाच्या वतीने बुधवारी (दि. 30) भुजबळ फार्म येथे पत्रकार परिषद घेऊन याबाबत माहिती देण्यात आली. संमेलनाचे स्वागताध्यक्ष तथा पालकमंत्री छगन भुजबळ, निमंत्रक तथा मंडळाचे अध्यक्ष जयप्रकाश जातेगावकर, सचिव सुभाष पाटील, कोशाध्यक्ष चंद्रकांत दीक्षित आदी उपस्थित होते. सनदी लेखापाल मिलिंद मोडक यांनी जमा-खर्च सादर केला. संमेलनासाठी राज्य शासन, आमदार निधी, नाशिक महापालिका, प्रायोजक, ग्रंथदालन भाडे या मार्गांनी 3 कोटी 57 लाख 45 हजार 594 रुपये निधी जमा झाला. त्यापैकी 3 कोटी 44 लाख 28 हजार 949 रुपये खर्च झाले, तर 13 लाख 16 हजार 645 रुपये शिल्लक असल्याचे मोडक यांनी सांगितले.

यावेळी स्वागत समिती सदस्य सुभाष पाटील, धर्माजी बोडके, प्रा. शंकर बोर्‍हाडे, संजय करंजकर, श्रीकांत बेणी, भगवान हिरे, मुकुंद कुलकर्णी, प्रशांत कापसे, मोहन सांगळे, प्रमोद पुराणिक, चंद्रकांत दीक्षित, किरण समेळ, अशोक पाटील, विनोद जाजू आदी उपस्थित होते.

स्मरणिकेसाठी आणखी पंधरवडा : साहित्य संमेलनाची स्मरणिका संमेलनातच प्रकाशित करण्याचा प्रघात आहे. या संमेलनात मात्र प्रातिनिधिक स्वरूपात स्मरणिकेच्या केवळ दहाच प्रतींचे प्रकाशन करण्यात आले. उर्वरित स्मरणिका साहित्य संमेलनातील मजकूर अंतर्भूत करून प्रकाशित केल्या जातील, असे सांगण्यात आले. मात्र, त्या अद्याप प्रकाशित न झाल्याने टीका होत होती. याबाबत विचारले असता, येत्या पंधरा दिवसांत स्मरणिका प्रकाशित होईल, असे सांगण्यात आले.

जेवणावळीस 64 लाख, मंडपाला दीड कोटी
संमेलनातील सर्वाधिक चर्चेत ठरलेल्या जेवणावळींवर 64 लाख 29 हजार रुपये, तर वॉटरप्रूफ मंडपावर 1 कोटी 61 लाख रुपये खर्च झाला. याशिवाय हॉटेल निवासावर 15 लाख 11 हजार, तर सांस्कृतिक कार्यक्रमांवर 3 लाख 2 हजार 979 रुपये खर्च झाल्याचे सांगण्यात आले.

हेही वाचा :

Exit mobile version