नाशिक : जिल्हा परिषदेत काढली खासगी वाहनाची हवा | पुढारी

नाशिक : जिल्हा परिषदेत काढली खासगी वाहनाची हवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
जिल्हा परिषदेत खासगी वाहनांना प्रवेशबंदी असतानाही काही ठेकेदारांकडून राजकीय नेत्यांची नावे सांगून वाहने मुख्यालयात आणण्याचे प्रकार सुरूच आहेत. त्यामुळे अखेर सुरक्षारक्षकांनी वरिष्ठांच्या सूचनेनुसार एका खासगी वाहनाच्या चाकामधील हवा काढून टाकली. यामुळे दिवसभरात सुरक्षारक्षकांचा त्रास कमी झाला, तरी सायंकाळी आमदार असलेली स्टिकर लावलेले वाहन जिल्हा परिषदेच्या मुख्यालयात येऊ दिल्याने ठेकेदारांनी नाराजी व्यक्त केली आहे.

जिल्हा परिषदेच्या मुख्यालयासमोरील रस्त्याचे खोदकाम करून ठेवल्यामुळे रस्त्याच्या कडेला वाहने उभे करता येत नाही. त्यातच जिल्हा परिषदेत प्रशासक कारकीर्द सुरू झाल्यानंतर खासगी वाहनांना मुख्यालयात प्रवेश करण्यास बंदी घातली. यामुळे माजी झालेल्या जिल्हा परिषद सदस्यांचीही वाहने आत येऊ दिली जात नाहीत. यामुळे रोजच कोणी ना कोणी सुरक्षारक्षकांसोबत हुज्जत घालत असतो. जिल्हा परिषदेत मंगळवारी (दि.29) एका ठेकेदाराने चारचाकी वाहन मुख्यालयात उभे केले. सुरक्षारक्षकांनी वाहनचालकास सांगण्याचा प्रयत्न केल्यानंतरही उलट उत्तरे दिली. यामुळे त्यांनी वरिष्ठांकडे तक्रार केल्यानंतर त्यांच्या सूचनेनुसार या वाहनांच्या चाकांची हवा काढून टाकल्याचा प्रकार घडला.

त्यानंतर दिवसभर कोणीही खासगी वाहनचालक अथवा मालकांनी सुरक्षारक्षकांना त्रास देण्याचा प्रयत्न केला नाही. मात्र, सायंकाळी विधानसभा सदस्यांसाठी असलेले स्टिकर लावलेले एक वाहन जिल्हा परिषदेत बिनदिक्कत आले. यामुळे अनेकांनी नाराजी व्यक्त केली. खासगी वाहनांना प्रवेशबंदी असताना कोणीही केवळ स्टिकर लावून येणार असेल, तर आम्हीही स्टिकर लावून गाड्या मुख्यालयात आणू शकतो, अशा शब्दांत अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

हेही वाचा :

Back to top button