नाशिक : शहर स्वच्छतेवरून आयुक्तांनी टोचले अधिकार्‍यांचे कान | पुढारी

नाशिक : शहर स्वच्छतेवरून आयुक्तांनी टोचले अधिकार्‍यांचे कान

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
नूतन आयुक्त रमेश पवार यांनी रुजू झाल्यानंतर खातेप्रमुखांच्या पहिल्याच आढावा बैठकीत शहर स्वच्छतेसंदर्भात संबंधित अधिकार्‍यांचे कान टोचत शहरातील साफसफाई दररोज झालीच पाहिजे, असे बजावले. आयुक्त महिनाभर नसला, तरी चालेल परंतु, सफाई कर्मचारी एक दिवस आला नाही, तर शहरात कचर्‍याचे ढीग साचतात आणि शहर बकाल दिसते, याकडे त्यांनी अधिकार्‍यांचे लक्ष वेधले.

बांधकाम, उद्यान व घनकचरा व्यवस्थापन विभागावर आपले विशेष लक्ष राहणार असल्याचे संकेतही त्यांनी बैठकीतून दिले. संबंधित तिन्ही विभागांनी एकत्रितरीत्या कामकाज करावे. उद्यान विभागाने शहरातील उद्यानांची स्वच्छता करून तेथील कचरा घंटागाडीमार्फतच खत प्रकल्पावर नेण्याची सूचना केली. शहरामधील मोठ्या बांधकाम प्रकल्पांनी जागेवरच ओल्या कचर्‍याची विल्हेवाट व विघटन कसे होईल. याद़ृष्टीने प्रकल्प तयार करावेत, अशा सूचना आयुक्त रमेश पवार यांनी दिल्या. खासगी कंत्राटदारामार्फत होणार्‍या साफसफाईबाबतही त्यांनी माहिती घेतली.

आयुक्तांची अधिकार्‍यांना तंबी…
महापालिकेतील कोणत्याही विभागप्रमुखांनी यापुढे प्रसार माध्यमांना माहिती देऊ नये, अशी तंबीच आयुक्त रमेश पवार यांनी सर्वच खातेप्रमुखांना दिली आहे. माहिती द्यायची असल्यास आपल्या किंवा जनसंपर्क विभागामार्फत दिली जाईल, अशी सूचनाही त्यांनी केली. पवार यांच्या या तंबीमुळे तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांची आठवण झाली. मुंढे यांनीदेखील अशाच प्रकारे अधिकार्‍यांना तंबी देत माध्यमांना माहिती देण्यास विभागप्रमुखांना बंदी घातली होती.

थकबाकी न भरल्यास गाळे सील…
महापालिकेच्या गाळेधारकांकडे मोठ्या प्रमाणावर थकबाकी असल्याने मार्चअखेर थकबाकी वसुलीसाठी मनपाच्या विविध कर आकारणी विभागाने कारवाई हाती घेतली आहे. त्या अनुषंगाने गाळेधारकांना नोटीस बजावण्यात आल्या असून, 24 तासांत थकबाकी अदा न केल्यास बुधवार (दि.30)पासून गाळे सील करण्यात येणार आहेत.
महापालिकेचे नाशिक शहरात अनेक ठिकाणी दीड हजारांहून अधिक गाळे आहेत. त्यात कॅनडा कॉर्नर, महात्मानगर, पंचवटी, नाशिकरोड, सातपूर याठिकाणी तर मोठमोठे शॉपिंग सेंटर असून, त्याठिकाणी मोठ्या प्रमाणावर बेरोजगार तसेच व्यावसायिकांना गाळे भाडेतत्त्वावर देण्यात आले आहेत. मात्र, गेल्या अनेक वर्षांपासून अनेक गाळेधारकांनी मनपाच्या तिजोरीत भाडेच जमा न केल्याने थकबाकीचा डोंगर वाढला आहे. त्यानुसार आता मनपाच्या कर आकारणी विभागाने या थकबाकीदार गाळेधारकांकडे आपले लक्ष वेधले असून, नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. बुधवार (दि.30)पर्यंत थकबाकीसह नियमित कर अदा न केल्यास गाळ्यांना सील ठोकण्याची कार्यवाही केली जाणार असल्याचे सांगितले.

मनपाकडे सव्वाशे कोटींची देयके सादर…
आर्थिक वर्ष पूर्ण होण्यास अवघे तीन दिवस बाकी असताना महापालिकेच्या लेखा विभागात विविध कामांची जवळपास सव्वाशे कोटी रुपयांची देयके सादर झाली आहेत. येत्या दोन-तीन दिवसांत आणखी बिले सादर होणार असून, दि. 31 मार्चपर्यंत देयके अदा केली जाणार आहेत.

गेल्या डिसेंबर महिन्यात तत्कालीन आयुक्त कैलास जाधव यांनी महापालिकेतील सर्वच खात्यांच्या कामकाजाचा आढावा घेत, सुधारित अंदाजपत्रक तयार केले होते. 53 कोटी 52 लाख रुपयांचे शिलकी अंदाजपत्रक सादर करताना 1142 कोटी 16 लाख रुपये भांडवली कामांसाठी, तर 1054 कोटी 42 लाख रुपयांची आस्थापना खर्चासाठी तरतूद केली आहे. अग्रीम रक्कम 92 कोटी 83 लाख रुपये ग्राह्य धरण्यात आली आहे. सुधारित अंदाजपत्रकाच्या अनुषंगाने मनपा प्रशासनाने अधिकचे दायित्व निर्माण होऊ नये याकरिता कामांचा प्राधान्यक्रम ठरवून अनावश्यक कामांना फाटा दिला आहे. 31 मार्चअखेरपर्यंत पूर्ण झालेल्या कामांची जवळपास 125 कोटींची देयके लेखा आणि वित्त विभागाकडे सादर झाली आहेत. येत्या दोन-तीन दिवसांत आणखी देयके सादर होण्याची शक्यता आहे. त्यानुसार देयके अदा केली जाणार आहेत.

हेही वाचा :

Back to top button