गॅस गळती; धुळे तालुक्यातील नेर शिवारातील घटना | पुढारी

गॅस गळती; धुळे तालुक्यातील नेर शिवारातील घटना

धुळे; पुढारी वृत्तसेवा : गुजरातच्या भरुच येथून चाळीसगाव येथे जाणाऱ्या टँकरमधून धुळे तालुक्यातील नेर शिवारात गॅस गळती सुरू झाली आहे. या टँकरमधून एलएनजी गॅस गळती होत आहे. हा गॅस ज्वालाग्रही नसल्याची माहिती पोलीस प्रशासनाने दिली आहे. पण खबरदारीचा उपाय म्हणून टँकर एका हॉटेलच्या आवारात लावण्यात आला आहे.

भरुच येथून जीजे 12 व्ही टी 3160 या क्रमांकाचा टँकर गॅस घेऊन नागपूर सूरत महामार्गावरून चाळीसगाव येथे जात होता. हा टँकर धुळे तालुक्यातील नेर शिवारात पोहोचल्यानंतर त्यातून गॅसची गळती सुरु झाली. ही बाब चालकाच्या लक्षात आली.

त्याने गाडी थांबवून ही माहिती तालुका पोलिसांना कळवली. त्यानंतर तातडीने पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांनी पथकास घटनास्थळी रवाना केले. याबरोबरच गॅस कंपनीच्या संबंधितांनाही माहिती देण्यात आली.

तसेच महामार्गावर एकेरी रहदारी सुरू करून टँकर उभा असलेल्या लेनची वाहतूक थांबवण्यात आली.

दरम्यान, या टँकरमध्ये लिक्विड नॅचरल गॅस असून त्यापासून सीएनजी गॅस बनवला जातो. तसेच हा गॅस स्फोटक तसेच ज्वालाग्रही नसून तो जड असल्याने जमिनीवर पडतो. त्यामुळे धोका कमी आहे.

हा टँकर एका हॉटेलच्या आवारात लावण्यात आला. दरम्यान, गॅस कंपनीने तातडीने दुसरा टँकर पाठवला आहे.

तज्ज्ञांच्या मदतीने गॅस दुसऱ्या टँकरमध्ये भरण्यास सुरुवात करण्यात आली आहे.

हे ही वाचा :

 

Back to top button