नाशिक : पुढारी वृत्तसेवा
जुनी पंडित कॉलनीतील रहिवासी नानासाहेब कापडणीस व त्यांचा मुलगा डॉ. अमित कापडणीस यांच्या खून प्रकरणी अटकेत असलेल्या तीन संशयितांच्या पोलिस कोठडीची मुदत संपत असल्याने त्यांना सोमवारी (दि. 14) न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. या तिघांकडून पोलिसांना महत्त्वाचे धागेदोरे मिळाल्याने तपासाला गती मिळाली आहे.
मालमत्ता हडप करण्याच्या हेतूने संशयित राहुल गौतम जगताप (36, रा. जुनी पंडित कॉलनी), विकास हेमके, प्रदीप शिरसाठ व सूरज मोरे या चौघांनी संगनमत करून दि. 16 डिसेंबर 2021 रोजी नानासाहेब कापडणीस यांचा, तर 26 डिसेंबरला मध्यरात्रीच्या सुमारास डॉ. अमित कापडणीस यांचा खून करून त्यांच्या मृतदेहांची विल्हेवाट लावली होती. त्यानंतर चौघांनी कापडणीस यांच्याकडील शेअर्स विक्री करून त्यातून आलेले पैसे वापरले. त्यांची मालमत्ता हडप करण्यासाठी प्रयत्नही केले. सुरुवातीला सरकारवाडा पोलिसांनी राहुलला अटक केली. त्याच्याकडील तपासात गुन्ह्याचा घटनाक्रम समोर आला. त्यानंतर पोलिसांनी औरंगाबाद येथून तीन संशयितांना अटक केली. त्यांच्याकडूनही पोलिसांना गुन्ह्यात वापरलेले वाहन, नानासाहेब यांची दुचाकी, सविस्तर घटनाक्रम, या गुन्ह्यात चौघांचा कसा व किती सहभाग होता, याची माहिती मिळाली.
पोलिस या तिघांकडे सखोल चौकशी करीत असून त्यांच्याकडून अधिक माहिती मिळण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तविली जात आहे. सोमवारी या तिघांनाही पुन्हा न्यायालयात हजर केले जाणार असून, त्यांना पोलिस कोठडीची मागणी करण्याची शक्यता आहे.