नाशिक : पुढारी वृत्तसेवा
दमदाटी करून अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार करून तिला गर्भवती करणार्याला न्यायालयाने जन्मठेप व दंड ठोठावला आहे. सचिन मुरलीधर सोनवणे (32, रा. वाल्मीकनगर, वाघाडी, पंचवटी) असे या आरोपीचे नाव आहे.
सचिन सोनवणेने 13 वर्षीय चिमुकलीवर नोव्हेंबर 2018 वारंवार अत्याचार केला. त्यानंतर याबाबत कोणाला सांगितले, तर काकाच्या मुलीवरही अत्याचार करण्याची धमकी दिल्यामुळे पीडिता घाबरली होती. मात्र, सचिनने पुन्हा तिच्यावर अत्याचार केले. यात पीडिता गर्भवती झाली व तिने एका चिमुकलीला जन्म दिला.
या प्रकरणी सचिनविरोधात भद्रकाली पोलिस ठाण्यात बालकांचे लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यासह बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला. भद्रकाली पोलिसांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सरकारी पक्षातर्फे अॅड. दीपशिखा भिडे यांनी युक्तिवाद केला. त्यांनी सात साक्षीदार तपासले. सचिनविरोधात गुन्हा शाबित झाल्याने विशेष पोक्सो न्यायालयाचे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश डी. डी. देशमुख यांनी सचिनला जन्मठेप व 10 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.