नाशिक : घरफोडी व वाहनचोरी करणारी टोळी जेरबंद, सात गुन्ह्यांची उकल | पुढारी

नाशिक : घरफोडी व वाहनचोरी करणारी टोळी जेरबंद, सात गुन्ह्यांची उकल

पंचवटी : पुढारी वृत्तसेवा : शहर परिसरात घरफोडी व वाहनांची चोरी करणार्‍या सराईत गुन्हेगारांच्या शिकलकरी टोळीला पंचवटी पोलिसांनी मोठ्या शिताफीने जेरबंद केले असून, या संशयितांकडून पंचवटी, गंगापूर, नाशिकरोड व आडगाव भागातील सुमारे सात घरफोड्यांची उकल झाली आहे. मात्र, पुणे जिल्ह्यात घरफोडीचे तब्बल 27 गुन्हे दाखल असलेला एक सराईत गुन्हेगार पसार झाला आहे.

रामसिंग धनसिंग भोंड (रा. सहकारनगर, भीमवाडी, गंजमाळ, भद्रकाली, नाशिक), चरणसिंग उत्तमसिंग शिकलकर (रा. नाशिक) आणि दोन अल्पवयीन अशी संशयितांची नावे आहेत. गोरखसिंग गागासिंग टाक (रा. हडपसर, पुणे) अशी फरार संशयितांची नावे आहेत. याबाबत पोलिसांच्या माहितीनुसार, पंचवटीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक डॉ. सीताराम कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे सहायक निरीक्षक सत्यवान पवार व अंमलदारांनी घरफोडी झालेल्या गुन्ह्यांचा तपास करताना सीसीटीव्ही फुटेज तपासले.

यामध्ये पल्सर दुचाकीवर दोन संशयितरीत्या फिरताना आढळले. या दोघांना पथकाने सापळा रचून पकडण्याचा प्रयत्न केला असता, ते गंजमाळ परिसरात पसार झाले. त्यांचा तपास सुरू असताना तीन दिवसांनंतर पथकाला याच संशयितांशी संबंधित चारचाकी वाहनातील 3 ते 4 व्यक्ती घरफोडी करीत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पंचवटीतील हनुमानवाडी येथे चौघे रेकी करीत होते. त्यांना पोलिस आल्याचे कळताच त्यांनी पळण्याचा प्रयत्न केला. पथकाने संशयितांच्या वाहनाचा पाठलाग केला.

या दरम्यान संशयितांचे वाहन मनपाच्या पंचवटी विभागीय कार्यालयाजवळील दुभाजकास धडकले. तेव्हा वाहन सोडून चौघे पळून जात असताना, पथकाने पाठलाग करून दोन अल्पवयीनांना हत्यारासह पकडले. संशयितांकडून सहा तोळे चोरीचे सोन्याचे दागिने हस्तगत केले. ही कामगिरी सहायक पोलिस आयुक्त मधुकर गावित, डॉ. सीताराम कोल्हे, पोलिस निरीक्षक युवराज पत्की (गुन्हे) यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक सत्यवान पवार, उपनिरीक्षक योगेश माळी, पोलिस नाईक कैलास शिंदे, नीलेश भोईर, राकेश शिंदे, नीलेश चव्हाण, योगेश सस्कर, विलास चारोस्कर, श्रीकांत कर्पे, नितीन जगताप, राहुल लभडे, अविनाश थेटे, गोरक्ष साबळे, नारायण गवळी, उत्तम झगडे, अमर निरगुडे, गितेश चव्हाण, जाधव यांनी केली.

फरार संशयितावर 27 गुन्हे दाखल
अटकेत असलेला रामसिंग धनसिंग भोंड उर्फ रामसिंग राजूसिंग जुन्नी याने त्याचा साथीदार गोरखसिंग गागासिंग टाक व अल्पवयीन मुलांच्या मदतीने नाशिक शहरात 7 गुन्हे केल्याची कबुली दिली आहे. रामसिंग भोंड ऊर्फ जुन्नी हा सातपूर पोलिस ठाण्याकडील घरफोडी व मोक्काअन्वये दाखल गुन्ह्यात जामिनावर आहे. त्याचा पळून गेलेला साथीदार गोरखसिंग टाक याच्याविरुद्ध पुणे शहर व ग्रामीणला विविध पोलिस ठाण्यांत घरफोडीचे 27 गुन्हे दाखल आहेत.

हेही वाचा :

दैनिक पुढारीचे नाशिक आणि उत्तर महाराष्ट्रासाठीचे हे फेसबुक पेज… नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील विविध बातम्या, लेख, व्हिडिओ असे सगळं काही या पेजवर असेल. नाशिकच्या द्राक्ष्यांचा गोडवा आणि मिसळचा झणझणीतपणा एकाच वेळी देण्याचा प्रयत्न आमची टीम करत आहे. त्यामुळे नक्की लाईक करा आणि फॉलो करा.. मंडळ आभारी आहे.. 😃 पेज लाईक करण्यासाठी येथे क्लिक करा.

पहा व्हिडिओ : व्हॅलेंटाईन डे स्पेशल -प्रेम एक भावना अनेक प्रश्न

 

Back to top button