Murder : अनैतिक संबंधाच्या आड येणार्‍या मुलास आईनेच संपविले | पुढारी

Murder : अनैतिक संबंधाच्या आड येणार्‍या मुलास आईनेच संपविले

जळगाव; पुढारी वृत्तसेवा : अनैतिक संबंधाच्या आड येणार्‍या मुलास आईनेच गळफास लावून ठार (Murder) मारल्याची धक्कादायक घटना जळगावात उघडकीस आली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी महिला आणि तिच्या प्रियकराला पोलिसांनी अटक केली असून दोघांची कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

सावखेडा शिवारात असलेल्या जलाराम नगरात विलास नामदेव पाटील हे राहतात. विलास पाटील हे चालक असून पत्नी मंगला पाटील आणि प्रमोद शिंपी यांचे वर्षभरापासून सूत जमले होते. त्यांच्या अनैतिक संबधांमध्ये मुलगा प्रशांत पाटील हा अडसर ठरत होता. म्हणून त्याची आई मंगलाबाई आणि प्रमोद शिंपी यांनी मुलाला १६ जानेवारी रोजी रावेर येथून कबुतर ठेवण्याचा पिंजरा घेवून येवू असे आमीष दाखवले. त्यानुसार मंगलबाई आणि प्रमोद या दोघांनी प्रशांत याला सोबत घेवून मध्यप्रदेशातील बर्‍हाणपुर गावानजीकच्या जंगलात घेऊन गेले. (Murder)

त्यांनी प्रशांत पाटील याला गळफास लावून झाडाला लटकावून (Murder) दिले. तेथून ही महिला पुन्हा जळगावात घरी आली. इकडे मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार प्रशांतचे वडील विलास पाटील यांनी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या प्रकरणी हरविल्याची नोंद करण्यात आली. पोलिसांनी मयत प्रशांतच्या मोबाईलचे कॉल डिटेल तपासले असता प्रमोद शिंपी यांच्या मोबाईलवर वारंवार कॉल केल्याचे दिसून आले. त्यानंतर पोलिसांनी तांत्रिक मदतीने प्रमोद शिंपी आणि मयत प्रशांत पाटीलचे लोकेशन एक असल्याचे दिसून आले. त्यानुसार पोलिसांनी तपासाला सुरुवात केली.

पोलिसांनी २६ जानेवारी रोजी संशयित आरोपी प्रमोद जयदेवर शिंपी याची कसून चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. यामध्ये मयत प्रशांतची आई मंगलाबाई पाटील याचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी दोघांना अटक केली. पोलिसांनी बर्‍हाणपुर येथील जंगलातील घटनास्थळी जावून मुलाच्या मृतदेहाचा पंचनामा केला.

दरम्यान, मुलाचा खून करणार्‍या दोन्ही संशयित आरोपींना गुरूवारी जिल्हा न्यायालयात हजर केले असता दोघांना न्यायालयाने कोठडी दिली. या गुन्ह्याचा तपास पोलिस निरीक्षक रामकृष्ण कुंभार, उपनिरीक्षक नयन पाटील, सहाय्यक फौजदार वासुदेव मराठे, सतीश हाळणोर यांच्यासह गुन्हेशोध पथकाने परिश्रम घेतले.

 

Back to top button