नाशिक मनपा आयुक्तांसह १४ जणांविरोधात हायकोर्टात अवमान याचिका दाखल

पंचवटी : पुढारी वृत्तसेवा : नाशिक महापालिका हद्दीत उड्डाणपूल व अन्य विकासकामांसाठीचा प्रस्तावित वृक्षतोडीचा प्रश्न अखेर थेट उच्च न्यायालयात पोहोचला आहे. याप्रकरणी नाशिकमधील मानव उत्थान मंचाने जनहित याचिका दाखल केली असून, त्यावर शुक्रवारी (दि.२८) व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सुनावणी होणार आहे. या सुनावणीला हजर राहण्यासंदर्भात मनपा आयुक्तांसह, मुख्य वनसंरक्षक, नगरसेवक आणि वृक्षप्राधिकरण समितीच्या सदस्यांना न्यायालयाने नोटीस बजावली आहे.

शहरातील उंटवाडी रोडवर उड्डाणपूल उभारण्यासाठी सुमारे ५८८ वृक्षांवर कुऱ्हाड पडणार आहे. विशेष म्हणजे यात २०० वर्षे जुन्या हेरिटेज वटवृक्षाचाही समावेश आहे. मनपाने चार ते पाच झाडे तोडलीदेखील आहेत. त्यामुळे संतप्त झालेल्या नाशिकमधील पर्यावरणप्रेमी संघटनांनी वृक्ष वाचविण्यासाठी या पुलाला विरोध करत वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलने सुरू केली आहेत. त्यातच बुधवारी (दि. २५) मानव उत्थान मंचाचे जगबिर सिंग आणि ऋषिकेश नाझरे यांनी थेट उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे.

मुख्य न्यायाधीशांनी ही याचिका दाखल करून घेत वनविभागाचे सचिव, नाशिकचे मुख्य वनसंरक्षक, नाशिक महापालिका, मनपा आयुक्त कैलास जाधव, मनपा शहर अभियंता यांच्यासह वृक्षप्राधिकारण समितीचे सदस्य तथा नगरसेवक चंद्रकांत खोडे, वर्षा भालेराव, संगीता गायकवाड, अजिंक्य साने, निलेश ठाकरे, श्यामकुमार साबळे तसेच पुंडलिक गिते यांना नोटीस बजावली आहे. यासाठी शुक्रवारी (दि.२८) दुपारी १२ वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे होणाऱ्या सुनावणीला या सर्वांना हजर राहावे लागणार आहे. यात न्यायालय काय निर्णय देते, याकडे सर्व नाशिककरांचे लक्ष लागून आहे.

चार वर्षांपूर्वी उच्च न्यायालयाने दिलेल्या एका आदेशानुसार वड, पिंपळ अशा प्रजातीची देशी वृक्ष कुठल्याही परिस्थितीत तोडता येणार नाहीत. असे असतानाही नाशिकमध्ये अशी वृक्ष तोडण्याची तयारी मनपा प्रशासनाने केली आहे. त्यामुळे न्यायालयाच्या आदेशाचे हे एकप्रकारे उल्लंघनच असून, न्यायालयाचा अवमान झालेला आहे.
– ऍड. तेजस दंडे, याचिकाकर्त्याचे वकील

वृक्ष तोडू नका, न्यायालयाचा अवमान होतो आहे, असे पत्रही आम्ही मनपाला दिले होते, तरीही त्यांनी बेकायदेशीरपणे वृक्षांवर कुऱ्हाड चालविल्याने अवमान याचिका दाखल करावी लागली. पर्यावरणाचा समतोल राखणारी वृक्ष तोडून होणारा विकास नाशिककरांना नकोय. वृक्ष न तोडताही विकास होऊ शकतो, हे स्मार्ट सीटीमार्फत विकास साधणाऱ्या महापालिकेला खरे तर सांगण्याची गरज नाही. सध्या नवनवीन तंत्रज्ञान विकसित झालेले आहे, त्याचा वापर करून वृक्ष वाचवून रस्ते, पूल बांधले गेले पाहिजे. रस्ते वा पुलावर काही विमाने उतरवायची नाहीत, की ते धावपट्टीसारखे सरळच हवेत. वळणदार रस्तेही चालू शकतील.
– जसबीर सिंग, मनाव उत्थान मंच, याचिकाकर्ता

वृक्षतोडीला ब्रेक
वृक्षतोडीचा विषय चांगलाच गाजत असून, शुक्रवारी (दि.२८) एकीकडे याप्रकरणी उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे, तर दुसरीकडे नाशिक दौऱ्यावर असलेले पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे हेदेखील शुक्रवारीच ‘त्या’ हेरिटेज वृक्षाची पाहणी करणार आहेत. त्यामुळे या दोन्ही ठिकाणच्या निर्णयांकडे सर्वांचे लक्ष लागले असून, वृक्षतोडीला तूर्तास तरी ब्रेक लागणार आहे.

हेही वाचा:

Exit mobile version