मालेगावमध्ये काँग्रेसला खिंडार : महापौर, माजी आमदारांसह २८ नगरसेवक राष्ट्रवादीत प्रवेश करणार - पुढारी

मालेगावमध्ये काँग्रेसला खिंडार : महापौर, माजी आमदारांसह २८ नगरसेवक राष्ट्रवादीत प्रवेश करणार

मालेगाव : पुढारी वृत्तसेवा : राज्याच्या राजकारणात चर्चेत राहण्याच्या प्रयत्नातील काँग्रेसला मालेगाव शहरात खिंडार पडले आहे. पुत्र माजी आमदार आसिफ शेख यांच्यापाठोपाठ पिता माजी आमदार शेख रशीद, महापौर ताहेरा शेख यांच्यासह 28 नगरसेवकांसह येत्या 27 तारखेला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. शेख रशीद यांनी मंगळवारी ही औपचारिक घोषणा केली.

काँग्रेसचे माजी आमदार आसिफ शेख यांनी गतवर्षी 8 फेब्रुवारीला काँग्रेसला सोडचिट्टी दिली होती. तेव्हा त्यांचे वडिल माजी आमदार शेख रशीद यांनी या निर्णयाबद्दल आश्‍चर्य व्यक्त करित अनभिज्ञता दर्शविली होती. परंतु, त्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यक्रमास सभागृहनेते असलम अन्सारी यांसह काँग्रेसींची उठबैस वाढली होती. दरम्यान, 13 ऑक्टोबरला शेख रशीद यांनी पक्षाच्या शहराध्यक्षपदासह इतर जबाबदार्‍यांमधून मुक्त होत असल्याचे पत्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना पाठविले होते. त्यानंतरही पक्षश्रेष्ठींकडून कोणत्याही प्रकारची मनधरणी झाली नाही.

पक्ष आणि शेख कुटुंबात संबंध ताणले गेल्यानंतर त्यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, राज्य कार्यकारिणी सदस्य राजाराम पानगव्हाणे यांच्यासह इतर वरिष्ठांविषयी जाहिररित्या नाराजी व्यक्त करत पक्षांतराचे संकेत दिले होते. अखेर मंगळवारी त्यांनी पत्रकारांशी बोलताना, गत 15 तारखेला नगरसेवक, पदाधिकारी यांच्यासमवेत झालेल्या बैठकीला हवाला देत राज्याच्या सत्तेत राहूनही पक्षाकडून कोणत्याही प्रकारचे पाठबळ, विकासनिधी मिळत नसेल तर अशा पक्षात राहण्यात काही अर्थ नाही, असे सांगून 27 तारखेला मुंबईतील राष्ट्रवादी भवनमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत महापौर ताहेरा शेख व 28 नगरसेवकांसह पक्षप्रवेश करणार असल्याची घोषणा केली. त्यानंतर शहरात सभा घेऊन कार्यकर्ते व समर्थकांना भूमिका समजावून सांगणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

नाशिक जिल्हा काँग्रेसचे अध्यक्षपद मालेगाव शहराकडेच असताना ‘मालेगाव मध्य’मध्ये पक्षाला घरघर लागली आहे. शेख कुटुंबाशिवाय मालेगाव शहर काँग्रेसची काय स्थिती असेल, याविषयी राजकीय वर्तुळात चर्चेला तोंड फुटले आहे. शिवाय, संपूर्ण गटच राष्ट्रवादीत दाखल होत असल्याने मालेगाव महापालिकेत राष्ट्रवादीची सत्ता प्रस्तापित होणार आहे.

हे ही वाचलं का 

Back to top button