नाशिक जिल्ह्यातील 1200 पेक्षा अधिक गावे कोरोनामुक्त

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गाचा वेग शहरी भागाच्या तुलनेने कमी असून, अद्याप जिल्ह्यातील 1927 पैकी 1251 गावे या महामारीपासून सुरक्षित आहेत. ग्रामीण भागातील दैनंदिन जीवनचक्र सुरळीत सुरू असल्याचे बघावयास मिळत आहे. या नव्या व्हेरिएंटची लक्षणे सौम्य असल्यामुळे चाचणी करून घाबरण्यापेक्षा चाचणी नकोच, अशी भूमिका ग्रामीण भागातील नागरिकांनी घेतल्यामुळे ही गावे कोरोनामुक्त असल्याचेही बोलले जात आहे.

तिसर्‍या लाटेची शक्यता गृहीत धरून, ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा सुसज्ज करण्यात आली होती. अँटिजेन किट खरेदी, प्रतिबंधात्मक औषधांची खरेदी, कोविड उपचार केंद्रांसाठी साहित्य खरेदी आदींची पुरेशी तरतूद करण्यात आली आहे. दरम्यान, गेल्या महिनाअखेरीपासून राज्यातील शहरी भागात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असताना ग्रामीण भागात बाधितांची संख्या तुलनेने कमी असल्याचे दिसून आले, तरीही जिल्हा आरोग्य प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून सर्व तालुक्यांमध्ये कोविड उपचार केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला.

तसेच सर्व उपजिल्हा रुग्णालये व ग्रामीण रुग्णालयांमध्येही कोविड रुग्णांवरील उपचाराच्या सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला. सध्या सिन्नर, निफाड या तालुक्यांमध्ये कोरोनाबाधितांची संख्या वाढत असली, तरी या नव्या व्हेरिएंटची बाधा झाल्याने रुग्णांना एखादा दिवस ताप व सर्दीशिवाय इतर लक्षणे दिसत नाहीत. साध्या उपचारानेही तीन दिवसांमध्ये आजार बरा होतो असे ग्रामीण भागातील नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे कोणाला ताप अथवा सर्दी झाली, तरी दोेन दिवस घरगुती उपचार करून बरे होत आहेत.

तालुका व कंसात कोरोनामुक्त गावे
नाशिक( 29)
बागलाण (133)
चांदवड (55)
देवळा (44)
दिंडोरी (43)
इगतपुरी (102)
कळवण (9)
मालेगाव (114)
नांदगाव (60)
निफाड (56)
पेठ (143)
सिन्नर (74)
सुरगाणा (165)
त्र्यंबकेश्वर (117)
येवला (107)

हेही वाचा :

Exit mobile version