श्रीपाल सबनीस, "विद्वानांनी इतिहासाचं विकृतीकरण केलं आहे" - पुढारी

श्रीपाल सबनीस, "विद्वानांनी इतिहासाचं विकृतीकरण केलं आहे"

धुळे, पुढारी वृत्तसेवा : “छत्रपती शिवरायांच्या महान इतिहासाचे अनेक विद्वानांनी विकृतीकरण करून जातीजातीचे वाद निर्माण करण्याचे काम केले आहे. यापुढे हिंदू-मुस्लीम असे कोणतेही वाद आम्हाला नको आहेत. भांडायचे असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांना त्यात आणू नका. महाराजांचे स्वराज्य हे सर्व जाती-धर्मांचे एकसंघ स्वराज्य निर्माण करणारे होते”, असे प्रतिपादन डाॅ. श्रीपाल सबनीस यांनी केले.

अहिराणी पुस्तक प्रकाशन सोहळ्याप्रसंगी धुळे जिल्ह्यात ते बोलत होते. एसएसव्हीपीएस कला व वाणिज्य महाविद्यालय, धुळे येथील प्राध्यापक, खान्देश साहित्य संघाचे अध्यक्ष डॉ. सदाशिव सुर्यवंशी यांच्या चार पुस्तकांचे आज प्रकाशन केले. ८९ व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून लाभले होते.

प्रकाशन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र काँग्रेसचे कार्याध्यक्ष आमदार कुणाल पाटील हे होते. यावेळी आमदार कुणाल पाटील म्हणाले, “खानदेशाचा आणि अहिराणी भाषेचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. तो अभिमान प्रत्येकाला वाटणे स्वाभाविक आहे. अहिराणी साहित्याचा वारसा खानदेशातील सर्व साहित्यिक समर्थपणे पुढे नेण्याचे काम करीत आहेत. देशात अनेक बोली भाषा लुप्त पावत चाललेल्या आहेत मात्र अहिराणी साहित्यकांमुळे आपली बोलीभाषा कधीही लोप पावणार नाही यासाठी सर्वतोपरी सहकार्य केले जाईल”, असे आश्वासन आमदार कुणाल पाटील यांनी दिले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेले डॉक्टर श्रीपाल सबनीस यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले की, “आज अनेक कलाकार, किर्तनकार, साहित्यिक अप्रत्यक्षपणे स्त्री समानता नाकारत असतात ही साहित्यशी केलेली बेईमानी आहे. मात्र स्त्रियांची समानता मानून अहिराणी साहित्यिकांनी साहित्याचे उदात्तीकरण केले आहे. अनेक विद्वानांनी शिवाजी महाराजांच्या इतिहासाचे विकृतीकरण करून इतिहासाचे वाटोळे करण्याचे काम केले आहे. जाती जातिचे वाद निर्माण करून दुफळी निर्माण करण्याचे काम केले जात आहे”, डॉ.  श्रीपाल सबनीस यांनी शेवटी सांगितले.

Back to top button