

मुंबई : गृहकर्जासाठी पत्नीने पतीच्या कागदपत्रांचा गैरवापर करून एका खासगी बँकेतून 50 लाखांचे कर्ज घेतल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी तक्रारदाराच्या घटस्फोटीत पत्नीसह तिच्या मित्राविरुद्ध एमआयडीसी पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.दोघांची लवकरच पोलिसांकडून चौकशी होणार आहे.
तक्रारदार हे कॉटनग्रीन परिसरात राहत असून अंधेरीतील एका खासगी कंपनीत कामाला आहेत. तेरा वर्षांपूर्वी त्यांची अनन्या नावाच्या एका महिलेशी विवाह झाला होता. यावेळी त्यांनी एका खासगी बँकेतून संयुक्तपणे सायन येथील एका फ्लॅटसाठी गृहकर्ज घेतले होते. डिसेंबर 2019 साली कौटुंंबिक वादामुळे त्यांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी संमतीने वांद्रे येथील कौटुंबिक न्यायालयात अर्ज केला. यावेळी त्याने न्यायालयात सायन येथील फ्लॅट पत्नीच्या नावावर करण्याचे आश्वासन देत नंतर तिच्या नावावर फ्लॅट गिफ्ट डिड केले. त्यानंतर त्यांचा घटस्फोट झाला. सध्या तक्रारदार स्वतंत्र राहत असून त्यांचा त्यांच्या पत्नीशी काहीही संबंध नाही.
अलीकडेच त्यांना एक कार घ्यायची होती, त्यामुळे त्यांनी कारसाठी एका खासगी बँकेतून कर्ज घेण्यासाठी अर्ज केला. यावेळी बँकेला त्यांच्या सिबील रिपोर्टमध्ये त्यांच्या नावावर एका खासगी बँकेचे 50 लाखांचे गृहकर्ज असल्याचे सांगण्यात आले. ही माहिती ऐकल्यानंतर त्यांना धक्काच बसला. त्यामुळे त्यांनी अंधेरीतील बॅंकेत चौकशी केली. चौकशीत त्यांना त्यांच्याच घटस्फोटीत पत्नीने त्यांची कागदपत्रे गृहकर्जासाठी सादर केल्याचे दिसून आले.
सहकर्जदार म्हणून त्यांनी त्यांचे कुठलेही कागदपत्रे बँकेत सादर केली नव्हती किंवा अर्जावर सह्या केल्या नव्हत्या. तरीही बँकेने तिला गृहकर्ज दिले होते. त्यांची बोगस स्वाक्षरी तसेच बोटांचे ठसे घेतले होते. गृहकर्जाच्या अर्जातील फोटो त्यांचा नव्हता. तो फोटो त्यांच्या घटस्फोटीत पत्नीच्या मित्राचा असून तो लालबाग येथे राहत असल्याचे त्यांना समजले. या दोघांनी त्यांची फसवणूक करण्याच्या उद्देशाने त्यांच्या नावासह कागदपत्रांचा दुरुपयोग केला होता. हा प्रकार लक्षात येताच त्यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार केली. तक्रारीची शहानिशा केल्यानंतर दोघांविरुद्ध पोलिसांनी बोगस दस्तावेज सादर करून फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला.