मुंबई : एकीकडे महाविकास आघाडीत निवडणुकीनंतरच राज्याचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा निश्चित केला जाईल, असे महाविकास आघाडीतर्फे स्पष्ट करण्यात आले असताना आता महायुतीचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण, असा प्रश्न विचारत शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी महायुतीवर अप्रत्यक्ष हल्ला चढविला.
‘पुढारी न्यूज’च्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त ताज प्रेसिडेंट येथे आयोजित केलेल्या ‘पुढारी न्यूज महासमिट’ चर्चासत्रात आदित्य ठाकरे यांची प्रकट मुलाखत ‘पुढारी न्यूज’चे अँकर अमोल जोशी यांनी घेतली. यावेळी त्यांनी भाजपसह एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेवर जोरदार प्रहार केला.
विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातच राज्याची विधानसभा निवडणूक लढली जाईल, अशी घोषणा महायुतीतर्फे करण्यात आली आहे. मात्र या निवडणुकीनंतर सत्ता आल्यास महायुतीतर्फे मुख्यमंत्री कोण होईल, याबाबत महायुतीतर्फे काहीही स्पष्टीकरण देण्यात आले नाही वा घोषणा करण्यात आलेली नाही. नेमके याच मुद्द्यावरून भाजप व महायुतीला लक्ष्य करण्याचा प्रयत्न आदित्य ठाकरे यांनी केला. राज्यातून भाजपला हद्दपार करणे, हेच आमचे लक्ष्य आहे.
जागावाटपाबाबत काही मतभेद असू शकतात. प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक पक्षाची ताकद असून त्याप्रमाणे जागावाटप होईल. आमच्या महाविकास आघाडीत मुख्यमंत्रिपदाचे अनेक चेहरे आहेत. राज्याच्या हिताचा चेहरा नक्कीच पुढे येईल. महायुतीने मुख्यमंत्रिपदाचा आपला चेहरा दाखवावा, असे आव्हानही ठाकरे यांनी यावेळी महायुतीला दिले.
देवेंद्र फडणवीस यांनी जे राजकारण केले, महाराष्ट्रात इतके नीच राजकारण कधी पाहिले नाही, असा थेट आरोप करतानाच आमचे हिंदुत्व घर पेटवण्यासाठी नाही तर चूल पेटवण्यासाठी असल्याचा जोरदार टोलाही आदित्य ठाकरे यांनी भाजपला लगावला. लाडकी बहीण ही योजना महायुती सरकारने काँग्रेसच्या वचननाम्यातून चोरलेली आहे. देशातील नागरिकांना 15 लाख रुपये देणार असल्याची भाषा करणार्यांनी महिलांना दीड हजार रुपये देऊन बोळवण केली, असा त्यांनी आरोप केला.
मुख्यमंत्रिपदासाठी सर्वाधिक आमदारांची अट लावणार्या काँग्रेसने आता निवडणुकीनंतर छोट्या पक्षालाही मुख्यमंत्रिपद दिले जाऊ शकते, असे वक्तव्य ‘पुढारी न्यूज’ वर्धापन दिन कार्यक्रमात केले. या सर्व वादाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्रिपदाचा चेहरा निवडणुकीआधी जाहीर केला जावा, या उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेचा पुनरुच्चार आदित्य ठाकरे यांनी केला. आधीच मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर केला तर त्याचे निवडणुकीत लाभ होऊ शकतात, असे ते म्हणाले.