पुढारी ऑनलाईन डेस्क
आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी (Maharashtra Assembly elections) वंचित बहुजन आघाडीने (Vanchit Bahujan Aaghadi) ११ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. रावेरमधून तृतीयपंथी शमिभा पाटील यांना वंचितने उमेदवारी दिली आहे. शमिभा पाटील ह्या लेवा पाटील समाजातील आहेत. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी आज शनिवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ११ उमेदवारांच्या नावांची घोषणा केली.
सिंधखेडा राजा येथून सविता मुंढे, वाशीमधून मेघा किरण डोंगरे, धामनगाव रेल्वे येथून निलेश विश्वकर्मा, नागपूर दक्षिण पश्चिम येथून विनय भांगे, साकोली येथून डॉ. अविनाश नन्हे, नांदेड दक्षिण मधून फारुक अहमद, लोहा येथून शिवा नरंगले, औरंगाबाद पूर्व येथून विकास रावसाहेब दांडगे, शेगाव येथून किसन चव्हाण आणि खानापूर येथून संग्राम कृष्णा माने यांची वंचित बहुजन आघाडीने उमेदवारी जाहीर केली आहे.
वंचितने त्यांच्या आघाडीमधील भारत आदिवासी पार्टी (BAP) आणि गोंडवाना गणतंत्र पार्टी (GGP) च्या उमेदवारांचीही घोषणा केली आहे. अनिल जाधव हे भारत आदिवासी पार्टीचे चोपडा येथून उमेदवार असतील. तर हरीश उके यांना रामटेकमधून उमेदवार दिली आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. नेत्यांनी मतदारसंघनिहाय दौरेही सुरू केलेत. जागा वाटपाची चर्चा, यात्रा, सभा, दौऱ्यामुळे राजकीय वातावरण तापू लागले आहे. महायुती आणि महाविकास आघाडीसह राज्यात तिसरी आघाडी स्थापन करण्याच्या हालचालीही सुरु आहेत.
वंचितचे सर्वेसर्वा ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर याआधीच नव्या आघाडीचे संकेत दिले होते. ओबीसी आणि आदिवासी संघटनांना सोबत घेऊन आम्ही आघाडी स्थापन करणार आहोत. त्यामुळे या आघाडीत कोणाला यायचे असल्यास त्यांनी आमच्याकडे यावे, आम्ही कोणाकडे जाणार नाही, असा सूचक इशाराही त्यांनी दिला होता. त्यानुसार त्यांनी ओबीसी आणि आदिवासी संघटनांना सोबत घेऊन आघाडी स्थापन करत उमेदवारांची घोषणादेखील केली आहे.
लोकसभा निवडणुकीदरम्यान मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांची भेट घेऊन मराठा समाजाचा पाठिंबा मिळविण्याचा आंबेडकर यांचा प्रयत्न राहिला होता. मात्र, आम्ही जरांगे यांच्यासोबत जाणार नसल्याचे त्यांनी नुकतेच स्पष्ट केले आहे.