विरोधी पक्षातून कोणी दिली होती PM पदाची ऑफर? गडकरींचा मोठा गौप्यस्फोट

Nitin Gadkari | 'आरएसएस'ला विचारु शकता- गडकरी
Nitin Gadkari
पंतप्रधानपदाच्या ऑफरबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मोठा खुलासा केला आहे. (File Photo)
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क

लोकसभा निवडणुकीपूर्वी विरोधी पक्षातील एका नेत्याने मला पंतप्रधानपदाची ऑफर दिली होती. पण मी ही ऑफर नाकारली होती, असा गौप्यस्फोट केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी याआधी केला होता. आता त्यांनी यावर आणखी एक खुलासा करत, आपण अशी कधी महत्त्वाकांक्षा बाळगली नव्हती, असे म्हटले आहे.

"जेव्हा मला विरोधी पक्षाकडून पंतप्रधानपदाची ऑफर दिली होती, तेव्हा मी त्यांना विचारले की तुम्हाला मला पंतप्रधान का करायचे आहे? आणि मी पीएम मोदी यांच्यासोबत का राहू नये?. त्यामुळे पंतप्रधान होणे ही माझी महत्त्वाकांक्षा नाही,” असे नितीन गडकरी इंडिया टुडे कॉन्क्लेव्हमध्ये बोलताना स्पष्ट केले.

पंतप्रधानपदाची ऑफर कोणी दिली?

जेव्हा त्यांना विचारण्यात आले की, पंतप्रधानपदाची ऑफर विरोधी पक्षातील शरद पवार अथवा सोनिया गांधी यांच्याकडून आली होता का? यावर त्यांनी भाष्य करण्यास नकार दिला. आपण या विषयावर काहीही बोलणार नाही. लोक याबाबत अटकळ बांधत असतील तर त्यांना मोकळीक असल्याचे त्यांनी सांगितले.

पंतप्रधान पदाचा उमेदवार बनण्याची ऑफर

मला लोकसभा निवडणुकीपूर्वी आणि नंतरही विरोधी पक्षाचा पंतप्रधान पदाचा उमेदवार बनण्याची ऑफर देण्यात आली होती, असाही गौप्यस्फोट गडकरी यांनी केला. "मला लोकसभा निवडणुकीच्या आधी आणि नंतरही ऑफर्स आल्या होत्या." असेही ते पुढे म्हणाले.

पीएम मोदी यांची जागा कोण घेणार?

जेव्हा त्यांना पंतप्रधान मोदींची जागा घेणार का? आणि सक्रिय राजकारणातून निवृत्तीबाबत विचारले असता, नितीन गडकरी म्हणाले की मी पंतप्रधानपदाच्या शर्यतीत नाही आणि सध्या मी आहे तिथे समाधानी आहे.

'RSS'ला विचारु शकता- गडकरी

"मी कसल्याही शर्यतीत नाही अथवा मी माझा बायोडेटा कोणालाही दिलेला नाही. मी माझे काम करत आहे. मी जिथे आहे तिथे आनंदी आहे. तुम्ही पंतप्रधान मोदी अथवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) यांना याबद्दल विचारा," असे ते म्हणाले.

'मला मंत्रीपदाची हाव नाही'

भाजपमधील त्याच्या भूमिकेबद्दल बोलताना ते म्हणाले, "मी पक्षाचा कार्यकर्ता आणि आरएसएसचा सदस्य आहे. मी मंत्री झालो नाही तरी मला कसलाही त्रास होणार नाही. राजकारण हे सामाजिक- आर्थिक सुधारणेचे साधन आहे, असे मला वाटते. मी माझे काम करत राहीन आणि कशाचीही काळजी करणार नाही.''

२०२४ आणि २०१९ मधील लोकसभा निवडणुकांदरम्यान पंतप्रधानपदाचे संभाव्य उमेदवार म्हणून नितीन गडकरी यांचे नाव चर्चेत राहिले होते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news