

मुंबई: तेरा वर्षांच्या मुलीला शिक्षिकेने छडीने मारहाण केल्याप्रकरणी लक्ष्मी खडका या शिक्षिकेविरुद्ध घाटकोपर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. दिवाळीचा होमवर्क पूर्ण केला नाही म्हणून तिने या मुलीला मारहाण केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. शुक्रवारी ही घटना घडली. यातील तक्रारदार त्यांच्या पत्नी आणि तीन मुलांसोबत घाटकोपर परिसरात राहतात. त्यांचा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय आहे. त्यांची तेरा वर्षांची मुलगी आठवीत शिकत असून जवळच असलेल्या खडका क्लासेसमध्ये खासगी शिकवणीसाठी जात होती.
शुक्रवारी दुपारी दोन वाजता ती नेहमीप्रमाणे ट्यूशनला गेली होती. सायंकाळी चार वाजता ती रडत रडत घरी आली. त्यामुळे त्यांच्यासह त्यांच्या पत्नीने तिच्याकडे विचारपूस केली होती. यावेळी तिने दिवाळीचा होमवर्क केला नाही म्हणून शिक्षिकेने तिला छडीने हातावर जोरात मारहाण केल्याचे सांगितले. या मारहाणीमुळे तिचे दोन्ही हात लाल झाले होते, हातावर छडीने मारहाण केल्याचे वळ दिसत होते.
यावेळी त्यांनी लक्ष्मीकडे विचारणा करुन तिला जाब विचारला होता. यावेळी तिने त्यांच्याशी हुज्जत घालून पुन्हा होमवर्क केला नाही तर तिला मारहाण करु असे सांगितले. या घटनेनंतर त्यांनी घाटकोपर पोलिसांना घडलेला प्रकार सांगून लक्ष्मी खडकाविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची पोलिसांनी गंभीर दखल घेत तिच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता आणि अल्पवयीन न्याय कायदा कलमातर्गत गुन्हा दाखल केला होता.