

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर एरव्ही आरोप-टीका करणाऱ्या शिवसेनेकडून (उद्धव बाळासाहेब ठकारे) आज मात्र त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. सामनामध्ये 'देवाभाऊ, अभिनंदन!'...या मथळ्याखालील अग्रलेखात विद्यमान मुख्यमंत्री हे गडचिरोलीला 'नक्षलवाद्यांचा जिल्हा' याऐवजी गडचिरोलीला 'पोलाद सिटी' ही नवीन ओळख मिळवून देणार असतील तर त्याचे स्वागत करायला हवे, अशा शब्दांत त्यांची स्तुती करण्यात आली आहे. फडणवीस यांच्यावरील ही स्तुती राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनला आहे.
२०१९ मध्ये महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर राज्यातील सत्तासंघर्ष ते अगदी विधानसभा निवडणुकीपर्यंतच्या काळात उद्धव ठाकरे व देवेंद्र फडणवीस यांच्यात आरोप प्रत्यारोपांचा सामना सुरू होता. परंतु, महायुतीचे सरकार आल्यानंतर नुकत्याच नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या होत्या. ही भेट चर्चेचा विषय ठरत नाही तोच शुक्रवारी सामना दैनिकातून त्यांच्यावर स्तुतिसुमने उधळण्यात आली आहेत. नव्या वर्षात मुख्यमंत्री फडणवीस आणि गडचिरोली जिल्ह्याला भेट दिली होती. या भेटीदरम्यान फडणवीस यांनी घेतलेल्या निर्णयाचे ठाकरेंकडून कौतुक करण्यात आले आहे. गडचिरोली हा महाराष्ट्राचा शेवटचा नव्हे तर पहिला जिल्हा म्हणून ओळखला जावा, यासाठी फडणवीस प्रयत्न करणार आहेत. ते चुकीचे नाही. फक्त गडचिरोलीच्या विकासाचा हा 'विडा' आपण तेथील सामान्य जनता आणि गरीब आदिवासी यांच्यासाठीच उचलला आहे, कोणा खाणसम्राटांसाठी नाही, हे दाखवून देण्याची काळजी देवाभाऊंना घ्यावी लागेल. तरच नवीन वर्षाच्या सूर्योदयापासून गडचिरोलीच्या परिवर्तनाची सुरुवात झाली आहे, हा त्यांचा वादा खरा होईल. बीडमध्ये बंदुकीचे राज्य कायम असले तरी गडचिरोलीत संविधानाचे राज्य येत असेल तर मुख्यमंत्री फडणवीस कौतुकास पात्र आहेत!, असे सामना अग्रलेखात म्हटले आहे.
सातारा दौऱ्यावर असलेले मुख्यमंत्री फडणवीस यांना याबाबत विचारले असता त्यांनी चांगले आहे, धन्यवाद... असे म्हणत सामनाचे आभार मानले, तर महाराष्ट्रातील राजकारण टीकेपुरता मर्यादित राहिलेले नाही. त्यांनी एखादे चांगले पाऊल उचलले असेल आणि राज्याची कायदा सुव्यवस्था, सामाजिक समीकरणे यांना दिशा देणारे ते पाऊल असेल तर सर्व राजकीय वैर दूर ठेवून त्यांच्या कामाचे कौतुक केले पाहिजे, ही शिवसेनेची भूमिका हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून आहे, असे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत पत्रकारांशी बोलताना म्हणाले.