मुंबई : राज्यातील गणेशोत्सवाची धामधूम संपत असतानाच राज्यातील राजकीय रणांगण तापणार आहे. विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीची जागावाटपाबाबत महत्त्वपूर्ण बैठक येत्या २० सप्टेंबर रोजी होणार आहे. दरम्यान, महाविकास आघाडीच्या आधी महायुतीचे जागा वाटप पूर्ण होईल, असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे.
मुंबईत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर सोमवारी महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीस फडणवीस यांच्यासह राष्ट्रवादीचे नेते व उपमुख्यमंत्री अजित पवारही उपस्थित होते. यावेळी काँग्रेसचे आमदार अमीन पटेल यांनी महायुतीत सामील होण्याबाबत त्यांचे मन वळविण्याचा प्रयत्न दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी केला. मुस्लिम मते आपल्याकडे वळविण्यासाठी महायुती हरत-हेचे प्रयत्न करू लागली आहे.
गेल्या आठवड्यात पवार आणि मुख्यमंत्री शिंदे यांच्यात वर्षा बंगल्यावर जवळपास तीन तास चर्चा झाली. या चर्चेस फडणवीस उपस्थित नव्हते. जागा वाटप, शिंदे गटातील आमदारांची पवारांच्या राष्ट्रवादीबद्दलची नाराजी आणि लाडकी बहिणीचे श्रेय यावरून या दोघांनी चर्चा केल्याचे कळते. जागावाटपाबाबत पवार आणि शिंदे यांच्यात झालेल्या चर्चेनंतर ही प्रक्रिया पुढे नेण्यासाठी भाजपचे प्रमुख नेते फडणवीस यांच्यासोबत पवारांनी सोमवारी चर्चा केल्याचे कळते. मविआत विविध फॉर्म्युल्यांवर चर्चा येत्या शनिवारी २० सप्टेंबर रोजी महाविकास आघाडीची जागावाटपाबाबत चर्चा होत आहे. मविआने मुंबईतील जागावाटपावर प्राथमिक चर्चा केली आहे. गेल्यावेळी जिंकलेल्या जागा आणि उर्वरित जागांपैकी विजयाची खात्री असलेल्या जागा हे मुद्दे लक्षात घेऊन काँग्रेस १०८ ते ११५, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) ९० ते ९५ आणि शिवसेना (उबाठा) ८५ ते ९० जागा असे जागा वाटप होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
लोकसभेप्रमाणे विधानसभा निवडणुकीतही महाविकास आघाडीत सर्वाधिक जागा आपल्याला मिळाव्यात, असा आग्रह उद्धव ठाकरे व शिवसेना करीत आहे. सर्वाधिक जागा लढल्या तर सर्वाधिक जागा जिंकू व त्यामुळे मुख्यमंत्रिपद शिवसेनेला मिळेल, अशी ठाकरेंची रणनीती आहे. मात्र काँग्रेस कोणत्याही परिस्थितीत यासाठी तयार नाही. कारण लोकसभा निकाल व निवडणूक पूर्व मत चाचण्या यात मुंबई व कोकण वगळता सर्वत्र राज्यात काँग्रेसला विजयाची सर्वोत्तम संधी असल्याचे कॉंग्रेसला वाटत आहे. मुंबई व कोकणात शिवसेना (ठाकरे) गटाला अधिक जागा देत विदर्भ-मराठवाड्यात कमाल जागा काँग्रेसने घेण्याची रणनीती आखली जात आहे. पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या राष्ट्रवादीला अधिक जागा मिळू शकतात.
राज्यात विधानसभेच्या एकूण २८८ जागा आहेत. महायुतीत भाजपला सर्वाधिक जागांवर निवडणूक लढवण्याची इच्छा आहे. भाजपला या निवडणुकीत किमान १५० जागांवर निवडणूक लढायची आहे, अशी चर्चा आहे. दुसरीकडे शिंदे यांच्या शिवसेनेलादेखील १०० जागा हव्या आहेत. स्ट्राईक रेट लक्षात घेऊन जागावाटप करण्याची भूमिका खुद्द मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त करून अधिक जागांसाठीचा दबाव वाढविला आहे. राष्ट्रवादीलाही ८० ते ९० जागा हव्या आहेत, असे वक्तव्य मंत्री छगन भुजबळ यांनी करून भाजपतर्फे देऊ करण्यात येत असलेल्या ६० ते ७० जागांच्या प्रस्तावास राष्ट्रवादीही राजी नसल्याचे या वक्तव्यानंतर स्पष्ट झाले आहे. अजित पवार यांनीसुद्धा महायुतीत ८० ते ९० जागा मागितल्या आहेत, अशी माहिती मंत्री छगन भुजबळ यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे. त्यांच्या वक्तव्याबाबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना प्रश्न विचारण्यात आला असता त्यांनी ७० ते ८० टक्के जागांवर महायुतीचे एकमत झाले आहे, असे सांगितले.