पुढारी ऑनलाईन डेस्क : महायुतीत अंतर्गत वाद सुरू आहेत. अजित पवारांना युतीतून बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. ही शिंदे गटाची भूमिका आहे, कारण त्यांच्या वाट्याला जागा कमी येऊ शकतात. सरकारमधील तीन पक्षात एकवाक्यता नाही, अशी टीका करत शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी महायुतीत जागावाटपावेळी मारामाऱ्या होतील, असा दावा केला. आज (दि. २०) दिल्ली येथे ते माध्यमांशी बोलत होते.
मुंबई-गोवा महामार्ग हा स्वर्गात जाण्याचा रस्ता आहे, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे. ठेकेदारांकडून पैशाची लूट सुरू आहे. सार्वजनिक बांधकाम, नगरविकास ही खाती शिंदे गटाची एटीम बनली आहेत. त्यामुळे कामं होत नाहीत. या महामार्गांवर अपघातांची संख्या वाढली आहे, असेही राऊत यांनी सांगितले.
नवाब मलिक देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल पुराव्यानिशी बोलत होते, म्हणूनच त्यांच्यावर सुडाने कारवाई केली होती. महाविकास आघाडी सरकारमध्ये नवाब मलिक जेव्हा सरकारी बाकावर बसायचे तेव्हा ते गुन्हेगार आहेत, असे सांगत नितीमत्तेचे पत्र फडणवीस यांनी अजित पवारांना लिहिले होते. फडणवीस यांनी ते पत्र मागे घ्यावे किंवा मलिक यांच्यावरील सर्व खटले खोटे आहेत हे जाहीर करावे, असे राऊत म्हणाले. नवाब मलिक लाडकी बहीण प्रमाणे मुख्यमंत्र्यांचे लाडके भाऊ झाले आहेत, असा टोला त्यांनी लगावला.