कोल्हापूर किंग्जला (बालवीर गोविंदा) नमवत गतविजेता सातारा सिंघम्सनी (जय जवान गोविंदा पथक) प्रो-गोविंदा लीगचा दुसरा हंगाम जिंकला. त्यांचे हे सलग दुसरे जेतेपद आहे. वरळीतील सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियम (एसव्हीपी) डोम येथे झालेल्या अंतिम फेरीत रविवारी जय जवानसमोर बालवीर पथकाचे आव्हान होते. थर लावण्यात जय जवान पथकाची हातोटी असली तरी प्रतिस्पर्ध्यांनी सहजासहजी हार मानली नाही. शेवटी अनुभवाच्या जोरावर चुरशीच्या फायनलमध्ये गतविजेत्यांनी बाजी मारली.
जय जवानने झळाळत्या ट्रॉफीसह २५ लाख रुपयांचे बक्षीस मिळवले. उपविजेता बालवीरला ट्रॉफी आणि १५ लाख रूपये मिळाले. उपांत्य फेरीत बालवीरने लातूर लिजेंड (यश गोविंदा) आणि जय जवानने अलिबाग नाईट्सवर (श्री आग्रेश्वर गोविंदा पथक) मात केली. उपांत्य फेरीतील पराभूत यश आणि श्री आग्रेश्वर पथकांना अनुक्रमे १० आणि ५ लाख रुपयांचे बक्षीस देण्यात आले. याशिवाय अंतिम फेरीसाठी पात्र ठरलेल्या उर्वरित बारा संघांना प्रत्येकी एक लाख रुपयांचे पारितोषिक मिळाले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत बक्षीस समारंभ झाला. यावेळी प्रो-गोविंदा लीगचे संस्थापक व अध्यक्ष, आमदार प्रताप सरनाईक यांच्या मार्गदर्शनाखाली प्रो-गोविंदा लीगचे अध्यक्ष पूर्वेश सरनाईक, प्रो-गोविंदा लीगचे संचालक मजहर नाडियादवाला, प्रो गोविंदा लीगचे संचालक मोहम्मद मोरानी आदी मान्यवर उपस्थित होते.प्रो-कबड्डी स्पर्धेच्या धर्तीवर आयोजित प्रो-गोविंदा लीगचे हे दुसरे वर्ष आहे. यंदा अव्वल १६ संघांमध्ये जेतेपदासाठी चुरस होती.