मुंबई ः श्रावण सोमवारी योगायोगाने जर एखाद्या शिवपिंडीवर नाग दिसून आला तर त्याची अर्थातच मोठी चर्चा होत असते. आता अशी भाविकांची श्रद्धा द्विगुणित करणारी एक घटना मुंबईत घडली आहे. तिथे एका सार्वजनिक गणेशोत्सवाच्या मंडपातील गणपतीजवळ एक मोठा उंदीर आला आणि तो चक्क नमस्काराच्या ‘पोज’मध्ये उभा राहिला. त्याचा व्हिडीओ आता सोशल मीडियात व्हायरल होत आहे.
या व्हिडीओत गणपती बाप्पाचे वाहन मूषक चक्क बाप्पाचा आशीर्वाद घेताना दिसत आहे. मिरा-भाईंदर येथील गणेश मंंडपात हा उंदीर मामा शिरला आणि चक्क मूर्तीच्या पाया पडताना दिसला. हा मूषकराज गणपती बाप्पाची मूर्ती बसवलेल्या टेबलच्या खाली उभा राहून, हात जोडून जणू काही बाप्पासमोर प्रार्थना करीत असल्यासारखे दिसला. अर्थात हा उंदीर दोन पायांवर उभे राहून, नाक हलवत वर काही खाऊ ठेवला आहे का हे पाहात होता! मात्र बाप्पाला अर्पण केलेला प्रसाद घेण्याआधी मूषकाचा ‘प्रार्थना’ करतानाचा हा क्षण कॅमेर्यात कैद झाला आणि आता तो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. बाप्पाचा आशीर्वाद घेतल्यानंतर हळूच बाप्पाचा आवडता प्रसाद मोदक तोंडात घेऊन उंदीर मामाने तिथून पळ काढल्याचं दुसर्या व्हिडीओत पाहायला मिळतंय. या व्हिडीओला 20.6 मिलियन व्ह्यूज आले आहेत. “मूषक बाप्पाला प्रार्थना करतो आहे”, असे कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आले आहे. हा व्हायरल व्हिडीओ पाहून अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एकाने कमेंट करत लिहिले, “प्राणी देवांशी अशाप्रकारे वागतात ते मला आवडते. माझी मांजर इतर कोणत्याही खोलीत बसणार नाही, ती नेहमी जाऊन आमचा गणपती असेल तिथेच बसते आणि ती बाप्पासमोर अशी बसते, जसे की ती लहान सिंहीण त्याच्या संरक्षणासाठीच बसलेली आहे.” तर दुसर्याने कमेंट करत लिहिले, “जिथे गणपती बाप्पा, तिथे त्याचे वाहन.”