मुंबई : ऑक्टोबर हिटमुळे मुंबईकरांना घामाच्या धारा लागल्या असताना पाणीपुरवठा करणार्या तलावांचा मात्र घसा कोरडा पडू लागला आहे. दैनंदिन पाणीपुरवठा वगळता बाष्पीभवनामुळे गेल्या 14 दिवसांत सातही तलावांतील 25 हजार 841 दशलक्ष लिटर पाणीसाठा घटला आहे. तलावांत आता 14 लाख 6 हजार दशलक्ष लिटर पाणीसाठा आहे.
सातही तलावामध्ये 14 लाख 47 हजार दशलक्ष लिटर पाणी साठवण्याची क्षमता आहे. 3 ऑक्टोबरपर्यंत 14 लाख 32 हजार दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा झाला होता. त्यामुळे क्षमतेपेक्षा 15 हजार दशलक्ष लिटर पाणीसाठा कमी होता. पावसाने विश्रांती घेतली आणि पारा चांगलाच चढला आहे. मुंबईचा पारा 35 अंश सेल्सियसपर्यंत पोहचला आहे. तर तलाव पाणलोट क्षेत्रातही उन्हाच्या चांगल्याच झळा बसत आहेत. त्यामुळे पाण्याचे मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन होत आहे. गेल्या 14 दिवसांत मुंबईला दैनंदिन होणारा पुरवठा वगळता बाप्पीभवनामुळे 25 हजार 841 दशलक्ष लिटर पाणीसाठा घटला आहे. हि मुंबईकरांचीसाठी चिंतेची बाब आहे. थंडी पडेपर्यंत ही घट कायम राहणार असल्याचे महापलिकेच्या अधिकार्यांनी सांगितले.
2024 मध्ये 3 ऑक्टोबरपर्यंत तलावाच्या पाणलोट क्षेत्रात 14 लाख 40 हजार 473 दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा झाला होता. यावर्षी 3 ऑक्टोबरपर्यंत पाणीसाठा 14 लाख 32 हजार 164 दशलक्ष लिटर इतका झाला. तर 2023 मध्ये हाच पाणीसाठा 14 लाख 37 हजार 417 दशलक्ष लिटर इतका होता. त्यामुळे मागील दोन वर्षाच्या तुलनेत तलांवत कमी पाणीसाठा आहे.