Mumbai News : MMRDAची बीकेसीतील पॉड टॅक्सी प्रकल्पासाठी सवलतकाराच्या नियुक्तीला मंजुरी

लास्ट माइल कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी राबविणार क्रांतिकारी पॉड टॅक्सी सिस्टीम
Pod Taxi
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) २८२व्या कार्यकारी समितीची बैठक मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. Pod Taxi File Photo
Published on
Updated on

मुंबई : Mumbai News | मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) २८२व्या कार्यकारी समितीची बैठक मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत मे. साई ग्रीन मोबिलिटी प्रायव्हेट लिमिटेड यांना वांद्रे-कुर्ला संकुलातील (बीकेसी) ऑटोमेटेड रॅपिड ट्रान्झिट सिस्टीम (पॉड टॅक्सी) प्रकल्पाचे डिझाइन, अभियांत्रिकी, विकास, बांधकाम, चाचणी, कार्यान्वयन तसेच ऑपरेशन व देखभाल सवलतकार (कन्सेशनेअर) म्हणून नियुक्ती करण्यास मंजुरी देण्यात आली आहे.

हा प्रकल्प डीएफबीओटी (डिझाइन-फायनान्स-बिल्ड-ऑपरेट-ट्रान्सफर) तत्त्वावर आधारित असेल. या कंपनीने मे. अल्ट्रा पीआरटी यांच्यासोबत भागीदारी केली आहे. अल्ट्रा पीआरटी हे तंत्रज्ञान प्रदाता असून लंडनच्या हीथ्रो विमानतळावर कार्यरत असलेल्या पॉड टॅक्सी प्रणालीच्या यशस्वी अंमलबजावणीचा त्यांना अनुभव आहे. हा प्रकल्प बीकेसीमधील लास्ट माइल कनेक्टिव्हिटी क्रांतिकारी बदल घडवेल. यामुळे बीकेसीमध्ये दररोज प्रवास करणाऱ्या ४ ते ६ लाख लोकांची गरज भागवली जाईल.

Pod Taxi
कोल्हापूर : 'ती'ने कर्ज मिळवून देतो असे सांगत १०० हून अधिक महिलांना घातला गंडा

बुलेट ट्रेन आणि नवीन व्यावसायिक इमारतींसारख्या आगामी पायाभूत विकास सुविधांमुळे वांद्रे-कुर्ला संकुल परिसरात येणाऱ्या अभ्यागतांच्या संख्येत वाढ होणार आहे. यामुळे लास्ट माइल कनेक्टिव्हिटी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. पॉड टॅक्सी प्रणाली पूर्णपणे स्वयंचलित असून, ती १५ ते ३० सेकंदांच्या अंतराने चालवता येते. वांद्रे-कुर्ला संकुलाला वांद्रे आणि कुर्ला उपनगरीय स्थानकांशी जोडणाऱ्या अरुंद रस्त्यांसाठी ही प्रणाली अत्यंत योग्य आहे.

एमएमआरडीएने नियुक्त केलेल्या व्यापक तांत्रिक-आर्थिक व्यवहार्यता अभ्यासानंतर (TEFS) पॉड टॅक्सी प्रणाली अमलात आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या प्रक्रियेत जगभरात कार्यरत असलेल्या विविध तंत्रज्ञानांचा अभ्यास करण्यात आला आहे. मे. टाटा कन्सल्टिंग इंजिनिअर्स यांनी या अभ्यासाचे परीक्षण केले आणि बीकेसीसाठी पॉड टॅक्सी प्रणालीची शिफारस केली. कारण, ही प्रणाली बीकेसी परिसराच्या भौगोलिक परिस्थितीसाठी आणि अपेक्षित वाहतूक वाढीसाठी योग्य असल्याचे दिसून झाले.

Pod Taxi
गणपती आणि आयुर्वेद! पूजेदरम्यान वाहण्यात येणाऱ्या २१ पत्रींचे महत्व काय?

पॉड टॅक्सी प्रणालीसाठी भाडे संरचनेची आखणी काटेकोरपणे करण्यात आली आहे. हे भाडे सध्या रिक्षा आणि बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये केलेल्या सर्वेक्षणावर आधारित आहे. सध्या प्रवासी बीकेसीला वांद्रे किंवा कुर्ल्याहून रिक्षाने प्रवास करण्यासाठी प्रति किलोमीटर ₹१५.३३, तर शेअरिंग रिक्षासाठी प्रति प्रवासी ₹३० ते ₹४० देतात. तसेच, टॅक्सी वापरणाऱ्यांना प्रति किलोमीटर ₹१८.६७ भाडे द्यावे लागते, तर ओला आणि उबर चालक २-३ किलोमीटरच्या कमी अंतराच्या प्रवासासाठी ₹८० ते ₹१००दरम्यान भाडे आकारतात. सर्वेक्षणात असे आढळले की सुमारे ७०% रिक्षाप्रवासी आणि ३६% बसप्रवासी पॉड टॅक्सी सेवेसाठी प्रति किलोमीटर ₹२१ इतके भाडे देण्यास तयार आहेत. त्याचप्रमाणे, टीईएफएस अभ्यासानुसार प्रति किलोमीटर ₹२१ इतक्या भाड्याची शिफारस करण्यात आहे. तसेच महागाई आणि ऑपरेशनल खर्च लक्षात घेऊन दर वर्षी ४% वाढीचा प्रस्ताव दिला आहे. एमएमआरडीए या प्रकल्पाच्या अटी-पूर्व टप्प्यावर (कंडिशन प्रिसिडेंट फेज) दर जाहीर करेल.

या प्रकल्पाला ६ मार्च २०२४ रोजी पार पडलेल्या एमएमआरडीएच्या १५६ व्या प्राधिकरण बैठकीत मंजुरी देण्यात आली. या प्रकल्पाचा अंदाजित खर्च ₹१०१६.३४ कोटी आहे आणि तो सार्वजनिक-खाजगी भागीदारी (पीपीपी) तत्वावर आधारीत आहे. टीईएफएस सल्लागाराने विकसित केलेल्या आर्थिक मॉडेलचे मे. टीसीईकडून पुनरावलोकन करण्यात आले आहे. या मॉडेलनुसार तीन वर्षांची बांधकाम कालावधी आणि ३० वर्षांचा सवलत कालावधी (कन्सेशन पिरियड) अपेक्षित आहे. मॉडेलमध्ये निश्चित सवलत शुल्क (कन्सेशन फी) आणि एमएमआरडीएला महसुलात हिस्सा मिळण्याची तरतूद आहे.

एमएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी, आयएएस, यांनी सांगितले, "बीकेसीमधील पॉड टॅक्सी प्रकल्प हे मुंबईतील सर्वात व्यस्त व्यावसायिक क्षेत्रात शहरी वाहतूक सुधारण्यासाठी उचलण्यात आलेले एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. ही प्रणाली लास्ट माइल कनेक्टिव्हिटी सुधारणार आहेच, त्याचबरोबर वाहतूक कोंडी कमी करून दररोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आधुनिक आणि कार्यक्षम प्रवास साधन उपलब्ध करून देईल."

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि एमएमआरडीएचे अध्यक्ष एकनाथ शिंदे म्हणाले, "हा अभिनव प्रकल्प, शहरी आव्हानांवर मात करण्यासाठी प्रगत तंत्रज्ञानाच्या उपाययोजना करण्याच्या आमच्या वचनबद्धतेचे प्रतीक आहे. पॉड टॅक्सी प्रणाली भारतामधील भविष्यातील शहरी वाहतूक प्रकल्पांसाठी एक आदर्श ठरेल. या वाहतूक प्रणालीमुळे आपल्या नागरिकांना शाश्वत आणि कार्यक्षम वाहतूक सुविधा मिळू शकेल."

Pod Taxi
नियमबाह्य प्रवेश होणार रद्द ;सीईटी सेलचे आदेश

वांद्रे-कुर्ला संकुलातील पॉड टॅक्सी प्रणालीची अंमलबजावणी हा मुंबईच्या पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी आणि जागतिक दर्जाच्या शहरी वाहतूक उपाय प्रदान करण्याच्या एमएमआरडीएच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमधील एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news