पुढारी ऑनलाईन डेस्क: बदलापूर अत्याचार प्रकरणात राज्यभरात मोठे पडसाद उमटत आहेत. आज (दि.२० ऑगस्ट) सकाळपासून बदलापूर रेल्वे स्थानकावर आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. या घटनेवरून संतप्त जमावाची दखल घेत गृहमंत्रालयाने मोठ्या कारवाईचे आदेश दिले आहेत.
बदलापूरच्या घटनेत प्रारंभीच्या काळात कारवाईत विलंब करणारे बदलापूर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक आणि हेडकॉन्स्टेबल यांना तत्काळ निलंबित करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाणे पोलिस आयुक्तांना दिले आहेत. यापूर्वी या प्रकरणात SIT ची स्थापना करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भात एक्स पोस्ट करत माहिती दिली आहे. खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालविण्यासाठी प्रस्ताव आजच दाखल करण्याचे आदेश दिले आहेत,असे ही फडणवीस यांनी म्हटले आहे.
दरम्यान, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी रेल्वे स्टेशन येथे जाऊन आंदोलकांची भेट घेतली. यावेळी ते म्हणाले की, बदलापूर येथे घडलेल्या घटनेच्या सविस्तर चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. एसआयटीची नियुक्ती केली आहे. बदलापूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि हेड कॉन्स्टेबल यांच्या निलंबनाचे आदेश दिले आहेत.