मुंबई : गेल्या लोकसभा निवडणुकीत आलेले अपयश आगामी विधानसभा निवडणुकीत भरून काढण्यासाठी राज्यातील महायुती सरकारने कंबर कसली आहे. त्याचाच एक भाग म्हणून ब्राह्मण, कुणबी आणि राजपूत समाजाला खूश करणारे निर्णय सोमवारच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आले आहेत.
मुंबई, कोकणात मोठ्या संख्येने तर कोल्हापूर जिल्ह्यात चंदगड परिसरात लक्षणीय प्रमाणात असलेल्या तिल्लोरी आणि तिलोरी कुणबी या समाजाचा इतर मागास प्रवर्गात केलेल्या समावेशाचा या भागातील विधानसभा निवडणुकीत लाभ होईल, असे सांगितले जात आहे. कोल्हापूर जिल्ह्याच्या दक्षिण-पश्चिम भागातील चंदगड गोवा आणि कर्नाटकच्या सीमेवर आहे. तिलारी नदीच्या जवळच्या भौगोलिक स्थानामुळे आणि शेतीच्या अर्थव्यवस्थेमुळे येथे तिलोरी कुणबी समाजाची लक्षणीय उपस्थिती आहे.
सुमारे ७० विधानसभा मतदारसंघांत तिल्लोरी आणि तिलोरी कुणबी समाजाची प्रभावी उपस्थिती आहे. आमच्या समाजाच्या मालकीची शेती नाही. आमच्या समाजातील लोक मोलमजुरी करतात. त्यामुळे कोकणासोबतच मुंबईत कामासाठी आमचा समाज स्थलांतरित झाला आहे. मुंबई व लगतच्या परिसरातील भांडुप, घाटकोपर, अंधेरी, मालाड, गोरेगाव, विलेपार्ले, मुलुंड, खार, विरार व नालासोपारा, डोंबिवली, दिवा, पनवेल व खारघर या परिसरात आमचा समाज स्थलांतरित झाला आहे. तसेच रत्नागिरीत अंदाजे ४ लाख, रायगडमध्ये ३ लाख, सिंधुदुर्गात अंदाजे १ लाख, अशी तिल्लोरी आणि तिलोरी कुणबी समाजाची लोकसंख्या आहे, असे तिल्लोरी आणि तिलोरी समाजाचा समावेश ओबीसी प्रवर्गात व्हावा म्हणून संघर्ष करणारे नंदू मोहिते यांनी सांगितले.
ब्राह्मण समाजासाठी परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेत राज्य सरकारने ब्राह्मण समाजाला खूश करण्याचा प्रयत्न केला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेतृत्व प्राधान्याने ब्राह्मण समाजाकडे असतानाही आणि संघाच्या दिशानिर्देशांनुसार भाजप काम करीत असतानाही ब्राह्मण समाजाचे प्रश्न प्रलंबित राहात असल्याची तक्रार ब्राह्मण समाजातर्फे केली जात होती. हा समाज प्राधान्याने भाजपचा व त्यांच्या हिंदुत्ववादी मित्रपक्षांचा समर्थक आहे. राज्यातील धार्मिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि प्रशासकीय क्षेत्रात ब्राह्मण समाजाचा निर्णायक प्रभाव आहे. शहरी आणि अर्ध-शहरी भागात हा समाज एकवटलेला असून राज्यातील काही विधानसभा मतदारसंघांमध्ये ब्राह्मणांची लक्षणीय उपस्थिती आहे. पुणे शहरात ब्राह्मणांची मोठी लोकसंख्या आहे. या शहरातील कसबा पेठ आणि शिवाजीनगर हे पुण्यातील विधानसभा मतदारसंघ ब्राह्मण मतदारांसाठी ओळखले जातात. नागपूर शहरात नागपूर दक्षिण-पश्चिम आणि नागपूर पूर्व या भागात ब्राह्मणांची लक्षणीय संख्या असून विशेषतः नाशिक मध्य आणि नाशिक पूर्व या मतदारसंघांमध्ये हा समाज निर्णायक स्थितीत आहे.
मुंबईतील दादर आणि विलेपार्ले या भागांमध्ये ब्राह्मणांची लक्षणीय लोकसंख्या आहे. मुंबईच्या जवळ असल्यामुळे आणि सुशिक्षित ब्राह्मण कुटुंबांचे उपनगरांमध्ये स्थलांतर झाल्यामुळे ठाणे शहर, डोंबिवली आणि कल्याण पश्चिम या मतदारसंघांमध्ये ब्राह्मणांची उपस्थिती आहे. कोल्हापूर जिल्ह्यात मराठा समाजाचे वर्चस्व असले तरी, कोल्हापूरच्या काही शहरी भागात ब्राह्मणांची वस्ती आहे. सातारा जिल्ह्यातही कराड विधानसभा मतदारसंघात ब्राह्मण समाजाची लक्षणीय उपस्थिती आहे.
राजपूत समाजासाठी वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांच्या नावाने महामंडळ स्थापण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. महाराष्ट्रात राजपूत लोकसंख्या तुलनेने कमी असून ते विखुरलेले आहेत. राजस्थान आणि गुजरातमधून काही शतकांपूर्वी स्थलांतरित झालेला हा राजपूत समाज आपली स्वतंत्र ओळख आजही कायम राखून आहे. धुळे आणि नंदुरबार उत्तर महाराष्ट्रातील जिल्हे, जळगाव जिल्हा, छत्रपती संभाजीनगर आणि मुंबई परिसरात हा समाज लक्षणीय प्रमाणात बघायला मिळतो. विधानसभा निवडणुकीत विजयाचा फरक अतिशय कमी राहण्याची शक्यता असताना हा समाज भलेही लोकसंख्येने कमी असला तरी त्यांची मते सत्ताधाऱ्यांना काट्याची लढत असलेल्या विधानसभा मतदारसंघांमध्ये महत्त्वाची ठरणार आहेत.